नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी
जीवनगौरव पुरस्कार स्वर्गीय रत्नाकर मतकरी यांना जाहीर
मुंबई, दि. १ जुलै
राज्य शासनामार्फत देण्यात येणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, आस्वादक स्वर्गीय रत्नाकर मतकरी यांना जाहीर झाला आहे. रु. ५ लाख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने रत्नाकर मतकरी यांच्या रंगभूमीवरील बहुमूल्य योगदानाचा गौरव, २०१९-२० या वर्षासाठीच्या नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्काराने करण्यासाठी शिफारस केली होती, परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू झाल्याने पुरस्काराची घोषणा आणि प्रदान समारंभ होण्यापूर्वीच रत्नाकर मतकरी यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे २०१९-२० या वर्षासाठीचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार स्वर्गीय रत्नाकर मतकरी याना मरणोत्तर घोषित करण्यात आला आहे.
श्री. मतकरी यांनी नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कांदबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य अशा सर्व साहित्य प्रकारांत दर्जेदार आणि सातत्यपूर्ण लेखन केले. साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार म्हणूनही त्यांनी मोलाचे योगदान आहे. त्यांनी महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहुर्तमेढ रोवून, सुमारे तीस वर्षे पदरमोड करुन बालनाट्यांची निर्मिती केली. मतकरी यांच्या कार्याचा गौरव अनेक पुरस्कार आणि सन्मान देऊन करण्यात आला आहे. संगीत नाटक अकादमी आणि साहित्य अकादमी या दोन्ही मान्यवर संस्थांकडून पुरस्कारप्राप्त ठरलेल्या मोजक्या व्यक्तिमत्त्वांत त्यांचा समावेश होतो.
नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी प्रभाकर पणशीकर, विजया मेहता, भालचंद्र पेंढारकर, मधुकर तोरडमल, सुलभा देशपांडे, सुधा करमरकर, आत्माराम भेंडे, अरुण काकडे, श्रीकांत मोघे, राकमकृष्ण नायक, लीलाधर कांबळी, बाबा पार्सेकर आणि जयंत सावरकर यांना प्रदान करण्यात आला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.