लातुरात मुख्य रस्त्यांवर निर्जंतुकीकरण फवारणी
लॉकडाऊनमध्ये पालिकेकडून खबरदारीच्या उपाययोजना
लातूर /प्रतिनिधी:कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. याअंतर्गत आज सोमवारी (दि.२०जुलै )शहरातील प्रमुख रस्त्यावरून निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी खबरदारी घेत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.या लॉकडाउनला पाच दिवस झाले असून जनतेच्या सहकार्यातून ते राबवले जात आहे. लातूर शहरातील जनतेनेही या लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. लॉकडाउनच्या कालावधीत खबरदारीच्या उपाययोजना करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासन कार्यरत आहे.त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी निर्जंतुकीकरण फवारणीस प्रारंभ करण्यात आला.यापूर्वीही पालिकेच्या वतीने शहरात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
सोमवारी सकाळपासूनच शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावर ही फवारणी सुरू झाली. महापालिकेच्यावतीने हायपोक्लोराईट या औषधाची फवारणी निर्जंतुकीकरणासाठी केली जात आहे. ही फवारणी करण्यासाठी महापालिकेच्या स्वच्छता विभागासह अग्निशमन दलाची वाहनेही वापरली जात आहेत. पहिल्या टप्प्यात शहरातील प्रमुख रस्त्यांवर फवारणी केली जाणार आहे. त्यानंतर अंतर्गत रस्त्यावरही फवारणी होणार आहे.शहराच्या सर्वच भागातील प्रत्येक रस्ता फवारणी करून निर्जंतुक केला जाणार आहे. महापालिकेचा स्वच्छता विभाग व अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह इतर विभागांचे कर्मचारीही या कामात गुंतलेले आहेत.आगामी काही दिवसात संपूर्ण शहर निर्जंतुकीकरण केले जाईल,अशी माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी दिली. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून खबरदारी घ्यावी. मंगळवारपासून लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सवलती देण्यात आलेल्या असल्या तरी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहनही महापौर गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.