इंदिराबाई देशमुख महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा १०० टक्के निकाल
कला व विज्ञान शाखेतही गुणवंतांची भरारी
हणेगाव (वार्ताहर) :
येथील इंदिराबाई देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, वाणिज्य शाखेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. तर कला शाखेचा निकाल ९३.८५ टक्के व विज्ञान शाखेचा निकाल ९६.८२ टक्के निकाल लागला असून, तालुक्यातील सर्वात जास्त निकाल या महाविद्यालयाचा लागला असून, येथील तीनही शाखेतील विद्यार्थ्यांनी घवघवित यश मिळविले आहे.
तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडत असून, या भागातील विद्यार्थीही कॉपीमुक्तीनंतर अभ्यासाला लागल्याचे दिसून आले आहे. यंदा बारावीच्या परीक्षेत येथील इंदिराबाई देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षा या कॉपीमुक्त वातावरणात पार पडल्या असून, परीक्षेदरम्यान महसूल, पंचायत, शिक्षण व पोलीस विभागाने कुठलाच गैरप्रकार होऊ दिला नसल्याने कॉपीमुक्त परीक्षा सध्या या भागातील विद्यार्थ्यांच्या अंगवळणी पडल्याचे दिसून आले आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी सुरू केलेली कॉपीमुक्त परीक्षा योजना या भागात चांगलीच रुजल्याचे दिसून येत आहे.
येथील इंदिराबाई देशमुख महाविद्यालयाने तालुक्यात चांगलीच गुणवत्ता टिकवून ठेवल्याचे या निकालावरून दिसून येत आहे. कला शाखेतून शुभांगी मदने ही ८३.३८ टक्के, निकिता सूर्यवंशी ८१.५३ टक्के, सुजिता भंगे ८०.४३ टक्के तर वाणिज्य शाखेतून सिकंदर चव्हाण ७२.६१ टक्के, आरतीका कांबळे ६९.३८ टक्के, सतीश कोयले ६९.२३ टक्के व विज्ञान शाखेतील शरयू राठोड ८५.५६ टक्के, शिवानी मठपती ७७.०७ टक्के व विशाल पटणे ७७.०७ टक्के गुण मिळवून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थाचालक शंकरराव राठोड, सचिव शारदादेवी राठोड, प्राचार्य फुलसिंग राठोड प्रा. रमेश राठोड, उपप्राचार्य श्री. पोकलवार, प्रा. बी. डब्ल्यू. सूर्यवंशी, प्रा. एन. एम. राठोड, प्रा. मांजरमकर आदींनी कौतुक केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.