हिंगोली जिल्ह्यात 6 ते 19 ऑगस्टपर्यंत संचारबंदी
· संचारबंदीच्या कालवधीत सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई
हिंगोली,दि.4: शेख इमामोद्दीन
जिल्ह्यात कोविड-19 बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात (ग्रामीण/ शहरी) सर्व प्रकारच्या हालचालीस (व्यक्ती/वाहन) व सर्व आस्थापनास दि. 5 ऑगस्ट, 2020 रोजी रात्री 12.00 वाजल्यापासून ते दि. 19 ऑगस्ट, 2020 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंतच्या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिले आहेत.
संचारबंदीच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्व बँका केवळ शासकीय कामकाजासाठी चालू राहणार असून, बँकेतील अधिकारी-कर्मचारी यांना ये-जा करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. परंतू सोबत त्यांना ओळखपत्र ठेवणे बंधनकारक असणार आहे. तसेच सदर कालावधीत अत्यावश्यक सेवा, सर्व शासकीय आस्थापना सुरु राहणार असून शासकीय अधिकारी-कर्मचारी, पत्रकार व त्यांचे कार्यालयीन कर्मचारी यांना सदर कालावधीत वार्तांकन आणि कार्यालयीन कामकाजासाठी तसेच जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गाची कामे व दुरुस्ती करण्यासाठी, आरोग्य, शासकीय विभागाशी संबंधित बांधकामे, महावितरण, महापारेषण आणि इतर विद्युत विषयक विभागाकडील देखभाल व दुरुस्तीची कामे, दूरसंचारशी संलग्न सेवा, पाणी पुरवठा, जलनिस्सारण आणि स्वच्छता विषयक कामे करण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतू याकरिता सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्याकडे संबंधित विभागाकडील आदेश, ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असणार आहे. तसेच सदर कालावधीत पेट्रोल पंप केवळ शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवा देणारी वाहने व कृषी सेवा संबंधित वाहने यांना इंधन पुरवठा करण्यासाठी चालू राहणार आहेत. तसेच अंतर जिल्हा प्रवासासाठी केवळ वैद्यकीय किंवा अपरिहार्य कारणासाठी ई-पास देण्यात येणार आहे. वैद्यकीय कारणासाठी ई-पासची मागणी करतेवेळी केवळ प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, तालुका शासकीय रुग्णालय किंवा जिल्हा शासकीय रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार असून याशिवाय इतर कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाहीत.
संचारबंदीच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी संचाराची मुभा असलेल्या व्यक्तींना सामाजिक अंतर राखणे व मास्कचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. संचारबंदी कालावधीत अत्यावश्यक सेवा, परवानगी घेतलेल्या व्यक्तीशिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्त्याने, बाजारामध्ये, गल्लीमध्ये, गावामध्ये, घराबाहेर फिरतांना आढळून आल्यास त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असल्याचे मानण्यात येईल. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.