अन्यथा पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन शहर भाजपाने केली लॉकडाऊन शिथील करण्याची मागणी


....अन्यथा पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन
शहर भाजपाने केली लॉकडाऊन शिथील करण्याची मागणी





लातूर ः कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून त्याची साखळी तोडण्यासाठी पालकमंत्र्यांच्या सुचनेनुसार लातूर शहरात लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. लॉकडाऊनची मुदत 15 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आलेली असून या लॉकडाऊनच्या काळात शहर परिसराअंतर्गतच लॉकडाऊन कडक करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणी मात्र लॉकडाऊन शिथील करण्यात आलेला आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारे कामगार व अनेक दिवसांपासून लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या व्यापार्‍यांसह सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे. त्यामुळे आता शहराअंतर्गतही लॉकडाऊन शिथील करण्यात यावा अशी मागणी शहर जिल्हा भाजपाच्यावतीने जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांनी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या अंदोलन करण्यात येईल असा इशाराही प्रसिध्दी पत्रकाद्वारे मगे यांनी दिला आहे.
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यासह संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आलेला होता. त्यानंतर दिनांक 1 जुन 2020 पासून अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या दरम्यानच लातूर जिल्ह्यातील अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असतांना कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे लक्षात आले. हा संसर्ग आटोक्यात आणून साखळी तोडण्यासाठी दि. 15 जुलै पासून लॉकडाऊन करण्यात आलेले होते. या लॉकडाऊनची मुदत 31 जुलै पर्यंत असतांना पुन्हा ही मुदत लातूर शहरात दि. 15 ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. मात्र हि लॉकडाऊनची प्रक्रिया जिल्ह्यातील इतर ठिकाणी लागू करण्यात आलेली नाही.
त्यामुळेच लातूर शहरातील व्यापारावर मोठा परिणाम झालेला असून जेथे लॉकडाऊनची प्रक्रिया नाही तेथे व्यापार्‍यांना नफेखोरीला वाव मिळत आहे. त्याचबरोबर लातूर शहरात हातावर पोट असणार्‍या कामगारांची मोठी दुर्दशा होवू लागली असून लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेला लातूरातील व्यापारी अधिकच त्रस्त झालेला आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन करणे हा एकमेव पर्याय नसून यासाठी अनेक वेगळे पर्यायसुध्दा आहेत मात्र लॉकडाऊन प्रक्रिया लातूर शहरात कडकपणे राबवून शहरवासीयांसह व्यापारी व हातावर पोट असणार्‍या कामगारांना वेठीस धरण्याचा प्रयत्न होवू लागला आहे. ही बाब लक्षात घेवून पालकमंत्र्यांनी लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यासाठी प्रशासनाला निर्देश द्यावेत अशी मागणी शहर जिल्हा भाजपाच्यावतीने जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांनी केली आहे.
ही मागणी दि. 5 ऑगस्ट पर्यंत मान्य न झाल्यास पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा गुरूनाथ मगे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या