विवेकानंद रुग्णालयात हाय फ्लो नेझल ऑक्सिजनेशन यंत्रणा
कोरोना रुग्णांसाठी
ठरतेय संजीवनी
लातूर/ प्रतिनिधी: विवेकानंद रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर सर्वोत्तम उपचार केले जात आहेत. यासाठी हाय फ्लो नेझल ऑक्सिजनेशन यंत्र रुग्णालयात वापरण्यात येत असून ही यंत्रणा कोरोना बाधित रुग्णांसाठी संजीवनी ठरत असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली.
मराठवाड्यात अशी यंत्रणा वापरणारे विवेकानंद रुग्णालय हे या परिसरातील एकमेव रुग्णालय आहे.कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. विवेकानंद रुग्णालयात हे अद्ययावत तंत्रज्ञान व यंत्रणा वापरून रुग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या ३५ ते ४० रुग्ण उपचार घेत आहेत.तज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे.कोरोनाबाधित रुग्णाला अधिक ऑक्सिजनची गरज असते.फुप्फुसांना दुखापत होऊ नये यासाठी अधिकचा ऑक्सिजन लागतो.ऑक्सीजन कमी पडला तर रुग्णाला व्हेंटिलेटर लावावे लागते परंतु व्हेंटिलेटरचेही अनेक दुष्परिणाम होतात. त्यामुळे कमी वेळात अधिक ऑक्सीजन पुरवण्यासाठी नेझल हाय फ्लो ऑक्सिजनेशन यंत्रणा काम करते. या माध्यमातून एका मिनिटामध्ये ६० लिटर ऑक्सिजन देता येऊ शकतो.त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांसाठी हे यंत्र संजीवनी ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून विवेकानंद रुग्णालयाने या यंत्राद्वारे उपचार सुरू केले आहेत.
विवेकानंद रुग्णालयात सध्या अशा दोन मशीन उपलब्ध असून रुग्णांची वाढती संख्या पाहता लवकरच आणखी तीन मशीन उपलब्ध केल्या जाणार आहेत. ही यंत्रणा महागडी असली तरी रुग्णांवर उपचार करून बरे करण्याला प्राधान्य आहे. अधिकाधिक चांगले आणि परिपूर्ण उपचार मिळावेत यासाठी रुग्णालय प्रशासन कटिबद्ध आहे. हाय फ्लो ऑक्सिजनेशन यंत्रणेचा अत्यवस्थ रुग्णांना सर्वाधिक लाभ होत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
लातुरात मृत्युदर वाढलेला असल्याची चर्चा होत आहे परंतु यात तथ्य नाही.आपल्याकडे आजार वाढल्यानंतरच रुग्ण येत आहेत.त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे कठीण जात आहे. रुग्णांनी सामान्य लक्षणे दिसताच उपचारासाठी पुढे यावे, असे आवाहनही विवेकानंद रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.