ज्ञानप्राप्तीसाठी गुरुउपासना हाच प्रभावी मार्ग ठरतो. - श्री गुरुबाबा महाराज औसेकर..

ज्ञानप्राप्तीसाठी गुरुउपासना हाच प्रभावी मार्ग ठरतो.
- श्री गुरुबाबा महाराज औसेकर..




गुरुकृपेमुळे प्राप्त होणाऱ्या ज्ञानाने मन निर्विकार होते. ज्ञानप्राप्तीमुळे मनाची निषिद्ध कर्माची हाव संपून विषयवासना गळून जातात. निर्विकार मनाने मनुष्य परमेश्वरी तत्वाशी एकरूप होतो. "विषय तो त्यांचा झाला नारायण" या न्यायाने कलियुगात "गुरुसेवेला" अनन्यसाधारण महत्त्व आहे,असे प्रतिपादन सद्गुरु श्री गुरुबाबा महाराजांनी केले आहे.

१ ऑगस्ट २०२०रोजीच्या नाथमंदिरातील श्रावणमास अनुष्ठाणांतील चक्रीभजनानंतर श्री ज्ञानेश्वरीवरील निरुपणात ते बोलत होते.
नाना भजन मार्गी ! धावत उघडिया अंगी !
एक रिघाताती सुरुंगी ! सुषुम्नी चिये !! (६५)
ऐसें जिये ज्ञानि ! मुनींश्वराची उत्तन्ही !
वेद तरुच्या पानोवणी ! हिंडताती !! (६६)
देईल गुरुसेवा ! इया बुद्धी पांडवा !
जन्म शताचा सांडोवा ! टाकीत जे !! ( ६७)

जीवाला भावसागराच्या बंधातून मुक्त करण्यासाठी देव बांधील आहे. त्यासाठी मुमुक्ष जीवाला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याची जरूर आहे. यासाठी भक्तांने गुरुउपदेशाचे विस्तृतपणे चिंतन करणे गरजेचे आहे, हा उपदेश माउलींनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात केलेले आहे, असेही श्री गुरुबाबा महाराजांनी या प्रसंगी म्हंटले आहे.

परब्रह्माच्या पलीकडे आणि अखेरीस स्थावरापर्यंत धरून दोहोंच्या दरम्यान उत्पन्न आणि लय पावते हे क्षेत्र आपण विस्ताराने पाहिलेच आहे. सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांच्या एकत्रिकरणाने होणाऱ्या कर्मसंगतीचे विवेवच त्यांनी या प्रसंगी केले. परमेश्वर प्राप्तीसाठी अनेक मार्ग आपल्याला सांगितले जातात. कोणी घोर अश्या तपसाधना करतो, सुषुम्ना वगैरेच्या मार्गाने योगसाधनेचा कोणी अंगिकार करतो. ज्यांना भगवंताच्या कृपेची प्राप्ती करून घ्यायची असते त्यांना सिद्धीच्या मार्गाने प्राप्त होणाऱ्या वैभवाची लालसा नसते. 

 कलीयुगात गुरुसेवा, गुरुउपासना आणि गुरुउपदेशाचे पालन यांचा महिमा अगाध आहे. गुरु सानिध्यात जी ज्ञानप्राप्ती होते  तिच्या मदतीने आपणांस परमात्म्याला ओळखण्याची दिव्यदृष्टी प्राप्त होते आणि जीवाचा उध्दार होतो..
शब्दांकन: अॅड शाम कुलकर्णी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या