लातूर महानगरपालिकेने शिवछत्रपती शिक्षण संस्थेस दिला हाबडा. इमारतीसह घेतली ताब्यात जागा.

 लातूर महानगरपालिकेने शिवछत्रपती शिक्षण संस्थेस दिला हाबडा. 

इमारतीसह घेतली ताब्यात जागा.




लातूर रिपोर्टर इफेक्ट 

 ( व्यंकटराव पनाळे, जिल्हा प्रतिनिधी )

लातूर: दि. २५ - शहरातील एक नामांकित शिवछत्रपती शिक्षण संस्था, साळे गल्ली लातूरच्या यशवंत प्राथमिक शाळेला ४३ वर्षांपूर्वी १ रुपया इतक्या नाममात्र भाडेकराराने तत्कालीन लातूर नगर परिषदेने इमारतीसह खुली जागा दिली होती. सदर जागेचा करार संपल्यानंतरही अनधिकृतपणे वापरण्यात येणारी इमारत व जागा लातूर शहर महानगरपालिकेने सोमवारी दि. २४/०८/२०२० रोजी ताब्यात घेतली.

महानगरपालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त सुंदर बोंदर यांच्या पथकाने या शाळेच्या प्रवेशद्वाराच्या कमानीवर महानगरपालिकेचा बोर्ड लावून गेट सीलबंद केले. १९७७ पूर्वी तत्कालीन लातूर नगर परिषदेने येथील नांदेड रोडवरील यशवंत प्राथमिक विद्यालयासाठी शिवछत्रपती शिक्षण संस्थेस साळेगल्ली लातूर यांच्याशी करार करून १ रुपया नाममात्र भाड्याने इमारत व जागा दिली होती. सदर इमारत व जागेचा करार संपला होता. तरीही अनधिकृतपणे भोगवटा वापर चालू होता. तत्कालीन नगर परिषदेमार्फत १९८४ पासून चार-पाच वेळा, तर महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर २०१४ पासून सदर संस्थेस नोटिसा बजावून इमारत व जागा खाली करण्याची सूचना केली जात होती. मात्र संस्थेकडून कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याने लातूर महानगरपालिकेने २० जानेवारी २०२० रोजी संस्थेच्या ताब्यातील जागा परत घेण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करून घेण्यात आला. ३० जून २०२० रोजी शिवछत्रपती शिक्षण संस्थेस पत्र पाठवून जागा परत करण्यास व जागा भाड्यापोटी थकलेल्या रकमेचा भरणा करण्याची सूचना करुनही भरणा केला नाही. त्यानंतर पुन्हा नोटीस बजावली व कोणताही अधिकार मान्य केला जाणार नसल्याचे निर्देश दिले होते. या सर्व पत्रव्यवहारानंतर व मनपा अधिनियम १९४९ च्या कलम ८१ (ब) अन्वये २४ ऑगस्ट २०२० रोजी सदर जागा व इमारत ताब्यात घेण्याची कार्यवाही आयुक्त देविदास टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. लातूर महानगरपालिकेच्या या निर्णयाचे लातूर शहरातून स्वागत करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या