शेतकरी हिताचे आंदोलन दडपणार्‍या पालकमंत्र्यांना फिरू देणार नाही ः गुरूनाथ मगे




शेतकरी हिताचे आंदोलन दडपणार्‍या पालकमंत्र्यांना फिरू देणार नाही ः गुरूनाथ मगे
लातूर(प्रतिनिधी)ः महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करू असे घोषणाबाजी केली होती. मात्र अद्यापही या कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील बहुतांश शेतकर्‍यांना प्राप्त झालेला नाही. केवळ घोषणाबाजी करण्यात मग्न असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी आता दडपशाही करण्यास सुरुवात केली आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी भाजपाच्या वतीने जे दूध आंदोलन करण्यात आले होते तेही पालकमंत्र्यांनी पोलिस प्रशासनाच्या साह्याने दडपवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हा प्रयत्न आम्ही हाणून पाडलेला असून आगामी काळात आंदोलन दडपणार्‍या पालकमंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी दिला आहे.
जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा महाराष्ट्रात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अडचणीत सापडलेला आहे. या अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना न्याय मिळावा याकरीता शहर जिल्हा भाजपाच्यावतीने शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या नेतृत्वाखाली बाभळगाव येथील दुधसंकलन केंद्राच्या परिसरात दूध आंदोलन करून रास्ता रोको करण्यात येणार होता. मात्र पालकमंत्र्यांनी पोलिस प्रशासनाच्या सहकार्‍याने हे आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बाभळगाव नाका येथे शहर जिल्हा भाजपाने रास्ता रोको केला.
यावेळी अध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या भोंगळ कारभाराचा समाचार घेत सर्वच आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरले असल्याचे सांगितले. विशेषतः सत्तेत आल्यानंतर शेतकर्यांचा सातबारा कोरा करू अशी घोषणा करणार्‍या महाविकास आघाडी सरकारचे खरे रूप आता समोर आले आहे. शेतकर्यांना आणखी अडचणीत आणत कमी दराने दूध खरेदी केली जात आहे. दूध उत्पादक शेतकर्यांना न्याय मिळावा याकरीता सरसकट प्रतिलिटर 10 रुपये अनुदान मिळावे, दूध भुक्टी निर्यातीला प्रतिकिलो 50 रुपये अनुदान द्यावे आणि गायीच्या दुधाची खरेदी प्रतिलिटर 30 रुपये लिटर दराने करावी या प्रमुख मागण्या सरकारकडे केल्या होत्या. मात्र अद्यापही याबाबत सरकारकडून कोणताच निर्णय न झाल्याने हे आंदोलन करण्यात येत आहे. रितसर व कायदेशीर मार्गाने आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार असतानाही, पालकमंत्र्यांनी प्रशासनाला हाताशी धरून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे. पालकमंत्र्यांची ही दडपशाही आगामी काळात खपवून घेतली जाणार नाही आणि दडपशाही केल्यास त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी यावेळी दिला.
यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनीही भूमिका मांडली. या आंदोलनात युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, सरचिटणीस शिरीष कुलकर्णी, प्रविण सावंत, नगरसेवक मंगेश बिराजदार, विशाल जाधव, प्रविण अंबुलगेकर, उपाध्यक्ष महेश कौळखरे, चिटणीस ऍड. दिग्विजय काथवटे, मंडल अध्यक्ष ज्योतीराम चिवडे, रवि सुडे, प्रवीण घोरपडे, गणेश गवारे, संजय गीर, नरेश पंड्या, शेख समीना, पार्वती सोमवंशी, प्रेरणा होनराव, गोरोबा गाडेकर, ओबीसी सेलचे देवा गडदे, अनुसूचित सेलचे विजय आवचारे, उद्योग सेलचे विकास देशपांडे, आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या