जे.एस.पी.एम.संस्थेने दिव्यांग लष्करेचा शैक्षणिक खर्च उचलला



जे.एस.पी.एम.संस्थेने दिव्यांग लष्करेचा शैक्षणिक खर्च उचलला
लातूर दि.01/08/2020
लातूर तालुक्यातील सिकंदरपूर येथील ब्रम्हांनद लष्करे या तरूणाने दोन्ही हात नसतांनाही अंगी शिक्षणाची जिद्द असल्यामुळे  कठोर परिश्रम व अभ्यासाला परिश्रमाची जोड देवुन मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत 66 टक्के गुण घेवून महाराष्ट्र विद्यालयाच्या माध्यमातून गुणवत्तेचा लातूर पॅटर्न त्याने निर्माण केलेला आहे. त्यामुळे तो दिव्यांग असतांनाही त्याची ही शिक्षणातील भरारी लक्षात घेवून जेएसपीएस संस्थेचे अध्यक्ष माजी.आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, संस्थेचे कार्यकारी संचालक अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी ब्रम्हदेव लष्करेच्या पुढील शिक्षणाचा खर्च उचलला असून त्याच्या यशाबद्दल  संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
ब्रम्हदेव   लष्करे हा दिव्यांग असतानाही ते शिक्षण घेवून मोठा व्हावा, अशी आई-वडीलांनी मनोमन अपेक्षा होती. परंतु ब्रम्हदेव लष्करेला दोन्ही हात नाहीत, त्यामुळे तोे शाळा कसा शिकणार असा प्रश्‍न कुटुंबियासमोर उभा होता. त्यातच संस्थेचे अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, मुख्याध्यापक गोविंद शिंदे, सहशिक्षक सुर्यकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून त्याला प्रेरणा मिळाली. आणि त्याने इयत्ता 10 वीच्या परिक्षेत 66 टक्के गुण घेवून गुणवत्तेत येण्याचा मान मिळविला. ब्रम्हदेव हा वडार समाजातील मजूरांचा मुलगा असूनही कठोर परिश्रमातून  त्याने अपंगत्त्वावर व परिस्थितीवर मात केली. आणि इयत्ता 10 वी मध्ये यशोशिखर गाठले. त्याची ही जिद्द लक्षात घेवून संस्थेचे अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, संस्थेचे कार्यकारी संचालक अजित पाटील कव्हेकर यांनी जे.एस.पी.एम.संस्थेच्यावतीने लष्करेच्या 11 वी व 12 वी च्या शिक्षणासाठीचा सर्व खर्च उचलण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखविला. संस्था एवढ्यावरच थांबणार नाही. तर भविष्यात लष्करेला स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याचा विश्‍वासही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केला.
प्रारंभी ब्रम्हादेव लष्करेचा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक अजित पाटील कव्हेकर , भाजपाचे व्यंकट पन्हाळे, सुर्यकांत शेळके, बाबासाहेब देशमुख, सुरेश लष्करे, मुख्याध्यापक गोविंद शिंदे, सहशिक्षक सुर्यकांत चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
--------------------------------------


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या