मेंढपाळांवरील हल्ले थांबवावेत- यशवंत सेना

मेंढपाळांवरील हल्ले थांबवावेत- यशवंत सेना

लातूर / प्रतिनिधी ः राज्यात मेंढपाळांवरील वाढत्या हल्ल्या वरून महाराष्ट्र यशवंत सेना आक्रमक झाली आहे. येत्या 6 ऑगस्ट 2020ला राज्यभरात जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयात या मागणीबाबत निवेदने देणार आहेत. राज्यातील मेंढपाळ बांधवांवरती होणारे हल्ले, अन्याय व अत्याचारा विरोधात स्वतंत्र कडक कायदा करुन मेंढपाळांच्या अन्य प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी अशी मागणी महाराष्ट्र यशवंत सेनेच्या वतीने करण्यात येणार असल्याचे एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे सांगितले आहे.
स्वतःचा शेती व्यवसाय नसल्यामुळे किंवा पुरेश्या चार्‍या अभावी आपले गाव सोडून हजारो मैल गावोगावी भटकंती करून मेंढपाळ आपला उदरनिर्वाह करीत असतात. मात्र सध्या कोरोनाच्या नावाखाली या मेंढपाळ बांधवांवरती गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गावगुंड, टवाळखोर यांच्याकडून होणार्‍या हल्ल्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. एकीकडे सर्वत्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक घटकांतील व्यक्तीवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. तशातच कुठल्याच शासकीय लाभात दखलपात्र नसलेला हा मेंढपाळ मुळातच समाजाकडून, राजकिय नेतृत्वांकडून दूर्लक्षीत आणि लाजरा बुजरा असणार्‍या या मेंढपाळ बांधवांची बरेच ठिकाणी तक्रार तर लांबच साधी दखल घेतली जात नाही. स्थानिक गावगुंडांकडून राजकीय/आर्थिक दबावा मुळे पोलीस प्रशासन मेंढपाळाच्या तक्रारीची दखल ही काही ठिकाणी घेत नाहीत. सद्य स्थितीत राज्यात रोज बर्‍याच ठिकाणी अशी प्रकरणे घडतच आहेत. शेतीव्यवसाया प्रमाणेच फार मोठ्या प्रमाणात मेंढपाळी हा व्यवसाय राज्यात केला जातो. म्हणून या गोष्टीची व मेंढपाळांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी यामागणीसाठी 6 ऑगस्टला राज्यभरातील जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर निवेदन देणार असल्याची माहिती महाराष्ट्र यशवंत सेनेचे लातूर जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सोलंकर यांनी एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.
तेंव्हा राज्यातील मेंढपाळांच्या मागण्यांची पूर्तता करावी, तसेच ज्या ठिकाणी गावगुंडांकडून किंवा टवाळखोरांकडून मेंढपाळ किंवा त्यांच्या परिवारावर अन्याय होत असेल अशांना कायदेशिर शिक्षा द्यावी आणि मेंढपाळांच्या तक्रारींची प्रशासनाकडून दखल घेतली जावी अन्यथा येत्या काळात मेंढपाळ बांधवांच्या सन्मानासाठी महाराष्ट्र् यशवंत सेनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा विषय झाला तर याची सर्वस्वी जवाबदारी शासनाची असेल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र यशवंत सेनेचे लातूर जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सोलंकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या