दवाखान्याचा खर्च करू न शकल्याने लातुर मधील वकील दासबाबांचा गेला प्राण !
खाजगी रुग्णालयातील महागड्या उपचाराने आर्थिक दुर्बल मागासवर्गीयाचा घेतला बळी.
{ व्यंकटराव पनाळे, जिल्हा प्रतिनिधी }
लातूर : दि. २५ - कोरोना महामारी मुळे सर्वच क्षेत्रामध्ये आर्थिक घडी विस्कटली आहे. लॉकडाऊन मुळे सर्व व्यवसायातील लोक मालक असो की कामगार मोठ्या प्रमाणात आर्थिक संकाटात सापडले आहेत. त्यात वकीली व्यवसाय सुद्धा अपवाद नाही. याचा अनुभव देणारी आणि सर्वांनाच विचार करायला लावणारी दुर्दैवी घटना नुकतीच लातूर शहरांमध्ये घडलेली आहे.
ॲड. दासबाबा सावळाराम कांबळे लातूर तालुक्यातील रामपूर मळा, सलगरा (बु), पो. बोरी या गावचे मूळचे रहिवासी असलेले अनेक वर्षापासून लातूर शहरातील खाडगाव रोड वरील संभाजी नगर जवळील सिद्धांत नगरात राहात होते. लातूर शहरातच त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला होता.
दि. १९ ऑगस्ट रोजी ॲड. दासबाबा सावळाराम कांबळे यांना अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे त्यांना लातूर शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी रुग्णाच्या मेंदुवर सूज आलेली आहे त्यांचे ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. रुग्णांच्या नातेवाईकांनी या ऑपरेशन साठी किती खर्च लागेल अशी विचारणा केली असता डॉक्टरांनी ऑपरेशन संबंधीची माहिती सांगून उपचारासाठी येणारा खर्चही सांगितला. तसेच एवढा खरंच करून ऑपरेशन केल्यानंतरही रुग्ण ठीक होईल याची खात्री देता येणार नाही असे त्यांनी सांगितले.
रुग्णाच्या ऑपरेशन साठी लागणारा खर्च करण्याची क्षमता रुग्णांच्या नातेवाईकात नसल्यामुळे अखेर रुग्णास घरी नेण्यात आले. खाजगी रुग्णालयातील महागड्या उपचारासाठी केवळ पैसे नसल्यामुळे ॲड. दासबाबा सावळाराम कांबळे यांचा अर्धांगवायुच्या झटक्याने मृत्यू झाला. ॲड. दासबाबा सावळाराम कांबळे यांना ॲड. डी. एस. कांबळे म्हणून ओळखले जात असत. ते कायदेशीर सेलचे सदस्य होते. अनेक उपेक्षितांना मदत करण्याचा त्यांचा स्वभाव होता मात्र केवळ गरीब परिस्थितीमुळे एका मागासवर्गीय समाजातील आर्थिक दुर्बल वकिलास पुढील उपचाराअभावी त्यांना घरी नेण्यात आले होते. शनिवारी दि. २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दि.२३ ऑगस्ट रोजी खाडगाव स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती अनुसयाबाई, कृष्णा व विश्वजीत ही दोन मुले आणि शारदादेवी हि मुलगी असा परिवार आहे.
लातूर जिल्हा वकील मंडळाने या घटनेचा बोध घेऊन कोणत्याही आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या वकीलाचा भविष्यात तरी पैशाअभावी उपचार न झाल्यामुळे मृत्यू होऊ नये यासाठी कांही उपाय योजना केल्यास त्याचा निश्चितच उपयोग होईल.
- व्यंकटराव पनाळे, मुक्त पत्रकार
९४२२०७२९४८
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.