लातूर रेल्वे स्थानकावर कोविड सेंटर उभारावे- निजाम शेख
पंतप्रधान सहाय्यता निधीतून १०० व्हेंटिलेटरचीही मागणी
लातूर/ प्रतिनिधी: मागील पाच महिन्यांपासून दोन रेल्वे गाड्या लातूर रेल्वे स्थानकावर उभ्या आहेत. लातुरातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शासकीय व खाजगी रुग्णालये कमी पडत असून उभ्या असणाऱ्या या रेल्वे गाड्यांचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर करावे.पंतप्रधान सहाय्यता निधीतून त्यासाठी १०० व्हेंटिलेटर देण्यात यावेत ,अशी मागणी मध्य रेल्वेच्या महाराष्ट्र मध्यप्रदेश कर्नाटक झोनल सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख यांनी केली आहे .
निजाम शेख यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक संजीव मित्तल यांना यासंदर्भात निवेदने पाठवली आहेत.
निजाम शेख यांनी या निवेदनात म्हटले आहे की, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर २२ मार्च पासून रेल्वेसेवा थांबवण्यात आली. तेव्हापासून दोन रेल्वे गाड्या लातूरच्या रेल्वेस्थानकावर उभ्या आहेत. देशात वाढता प्रादुर्भाव पाहता रेल्वेने तत्परता दाखवत आपल्या अनेक कोचचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर केलेले आहे. आता लातूरमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढणारी रुग्ण संख्या पाहता शासकीय रुग्णालय तसेच शहरातील खाजगी रुग्णालयातील यंत्रणेवर ताण येत आहे.रुग्ण वाढल्यामुळे खाटा अपुऱ्या पडत आहेत.
लातूरच्या रेल्वेस्थानकावर दोन गाड्यांचे मिळून एकूण ३६ कोच उपलब्ध आहेत. अडचणीच्या काळात या कोचचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर करावे. त्यामुळे जनतेची सोय होणार असून शासनालाही मदत होणार आहे. या कोविड सेंटरसाठी पंतप्रधान सहाय्यता निधीतून १०० व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कोरोनाच्या संकटात शासकीय रुग्णालयात उपचार मिळत नाहीत तर खाजगी रुग्णालयात रुग्णांची लूट केली जात आहे. अशा काळात रेल्वेच्या या रुग्णालयाचा रुग्णांना मोठा फायदा होणार आहे.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या काळासाठी रेल्वे सेवा बंद असून रेल्वेचे ही नुकसान होत आहे.कोविड सेंटर सुरू केले तर राज्य शासन जो निधी खाजगी कोविड सेंटरला देत आहे तो निधी रेल्वेलाही मिळू शकणार आहे. लातूरच्या रेल्वेस्थानकावर अद्ययावत सुविधा आहेत.शिवाय यापूर्वी लाईफ लाईन एक्सप्रेस ही आरोग्य सुविधा देणारी रेल्वे गाडी लातूरच्या रेल्वेस्थानकावर येऊन गेलेली आहे.
रेल्वेच्या एका कोचमध्ये ३२ रुग्णांवर उपचार करता येवू शकतात.त्यामुळे लातुरात उभ्या असणाऱ्या ३६ कोचमध्ये जवळपास ११०० रुग्णांवर उपचार करणे शक्य आहे.
या सर्व बाबींचा विचार करता दोन रेल्वेगाड्यांच्या कोचचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर करून त्यासाठी १०० व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावेत.ही व्यवस्था शक्य नसेल तर मुंबईत तयार करून ठेवलेल्या १०० कोचपैकी ३६ कोच लातुरसाठी पाठवावेत अशी मागणी निजाम शेख यांनी केली आहे.रेल्वेसेवा बंद असल्याने अनेक ठिकाणची रखडलेली कामे या कालावधीत करून घ्यावीत, असेही शेख यांनी या निवेदनाद्वारे सुचवले आहे.
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717
Mobile No. 9422071717
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.