कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही
-राज्यमंत्री संजय बनसोडे
निलंगा(मोईज सितारी):- निलंगा उपविभागातील निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कोविड-19 च्या परिस्थितीची माहिती घेऊन कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही असे निर्देश पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम ),रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले.
निलंगा पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित कोविड-19 प्रादुर्भाव बाबतचा आढावा बैठकीत राज्यमंत्री संजय बनसोडे बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, उपविभागीय अधिकारी विकास माने, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख, तहसीलदार सर्वश्री गणेश जाधव, सुरेश घोळवे, अतुल जटाळे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते व निलंगा नगर परिषदेचे मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील यांच्यासह इतर तालुकास्तरीय यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
राज्यमंत्री बनसोडे पुढे म्हणाले की कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. नागरिकांनीही शासन व प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे. तसेच निलंगा उपविभागातील कोविड-19 च्या परिस्थिती ची माहिती घेऊन एक ही कोरोना बाधित रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने सर्व सोयीं सुविधा व औषधोपचार उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
त्याप्रमाणे निलंगा उपविभागतील सार्वजनिक बांधकाम विभाग व पाणी पुरवठा विभागाचे प्रलंबित योजना तात्काळ मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, असे ही निर्देश राज्यमंत्री बनसोडे यांनी दिले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ढगे यांनी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधांची माहिती दिली. तर उपविभागीय अधिकारी माने यांनी प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेची कशा पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येत आहे याची माहिती प्रास्ताविकात दिली. तर पंचायत समिती चे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
*********
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.