दिवंगत पत्रकार गंगाधर सोमवंशी यांच्या वारसास शासनाने आर्थिक मदत करावीमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना साकडे


दिवंगत पत्रकार गंगाधर सोमवंशी यांच्या वारसास शासनाने आर्थिक मदत करावी
........................
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना साकडे




लातूर / प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या संकटात सेवा करताना कोविड १९ चा संसर्ग होऊन मृत्यू पावलेले लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार गंगाधर सोमवंशी यांच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. शासनाने पत्रकारांसाठी कोवीड १९ अंतर्गत जाहीर केलेल्या ५० लाख रुपये विमा योजनेचा लाभ सोमवंशी यांच्या वारसदारांना द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या लातूर शहर शाखेच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदाद्वारे केली.
लातूर येथील पत्रकार गंगाधर सोमवंशी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने २८ जुलै २०२० रोजी शासकीय रुग्णालयात दाखल   करण्यात आले. मात्र त्यांचा ३० जुलै रोजी मृत्यु  झाला. या आजाराला रोखण्यासाठी राज्य शासनाने अत्यावश्यक सेवा म्हणून पोलिस, आरोग्य, व शासकीय कर्मचारी यांना ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा आदेश जारी केला आहे. तर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांनाही या विमा योजनेचा लाभ देण्याची घोषणा केलेली आहे. पत्रकार गंगाधर सोमवंशी यांचे कोविड रुग्णालयात उपचार घेताना दुर्दैवी  निधन झाले.   त्यांची आर्थीक परिस्थिती हलाखीची असल्याने खाजगी दवाखान्यात उपचार घेऊ  शकले नाहीत. त्यांच्या पश्चात घरची आर्थीक परिस्थिती हलाखीचीच आहे. त्यामुळे सोमवंशी यांच्या वारसांना राज्य सरकारने घोषित केल्याप्रमाणे ५० लाख रुपये विम्याची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या लातूर शहर शाखेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्घव ठाकरे, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याकडे करण्यात आली. या मागणीचे निवेदन संघाचे शहर जिल्हाध्यक्ष बालाजी फड व कार्याध्यक्ष हरिराम कुलकर्णी यांनी तहसीलदार रुपाली चौगुले यांना जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी फिजिकल डिस्टन्स राखत दिले. निवेदनावर सचिव शहाजी पवार, उपाध्यक्ष  संगम कोटलवार आदी पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या