माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे कणखर, संघर्षशील, चारित्र्यसंपन्न नेतृत्व हरपले आहे - अमित विलासराव देशमुख


माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे

कणखर, संघर्षशील, चारित्र्यसंपन्न नेतृत्व हरपले आहे

-    अमित विलासराव देशमुख

लातूर( प्रतिनिधी):

    महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, हैदराबाद मुक्ती लढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आदरणीय डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे कणखर, संघर्षशील, चारित्र्यसंपन्न लोकप्रिय नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दुःख व्यक्त केले आहे.

   आपल्या शोकसंदेशात मनातील भावना व्यक्त करताना पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे की, आपल्या सर्वांसाठी दादासाहेब म्हणून परिचित असलेले आदरणीय डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब हे एक कणखर, मुरब्बी, धुरंदर, अभ्यासू,  लोकप्रिय असे व्यक्तिमत्त्व होते. नेहरू-गांधी घराण्याच्या विचारांशी एकनिष्ठ राहिलेल्या डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा जीवन प्रवास अगदी जन्मल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत संघर्षमय राहिला आहे. त्यांच्या एकूण कारकिर्दीचा उल्लेख करताना त्यांनी शून्यापासून सुरुवात करून विश्वाची निर्मिती केली होती असे म्हटले तरी ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. समाजकारण आणि राजकारणात त्यांनी कमालीची झेप घेतली होती. निलंगा हे त्यांच्या कायम हृदयापाशी राहिले आहे, तेथून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली आणि ते राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले.

   महाराष्ट्र, मराठवाडा, लातूर जिल्हा आणि निलंग्याच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे, महाराष्ट्राच्या विधिमंडळाची उभारणी, औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची सुरुवात, विदर्भातील गोसीखुर्द प्रकल्प, आपणा सर्वांना परिचित असलेलले उजनी धरण, निम्न तेरणा प्रकल्प मसलगा धरण यासह त्याने केलेली अनेक  कामे आपणाला त्यांचे कायम स्मरण देत राहतील, खरेतर आदरणीय डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या नावाने लातूर जिल्ह्याची ओळख पटते, काँग्रेस पक्षाला उभारी देण्यात या तिन्ही नेत्यांचे योगदान, तपश्चर्या आणि श्रम मोलाचे ठरले आहे.

   डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांना मी लहानपणापासूनच पाहिले आणि ऐकले आहे, मी राजकारणात आल्यानंतर त्यांचा मला स्नेह आणि जवळून सहवास लाभला आहे. विधिमंडळात मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून गेलो तेव्हा तेही निलंगा मतदारसंघातून  आमदार म्हणून निवडून आलेले होते. त्यामुळे विधीमंडळात त्यांच्या समवेत एकत्रित काम करण्याचे सौभाग्य मला मिळालेले आहे. त्या काळातील त्यांच्यासोबतचे अनेक अनुभव माझ्या कायम स्मरणात राहतील, त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे होते ते मी शिकलो आहे. आज ते आपल्यातून निघून गेले आहेत त्यामुळे कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने निलंग्याने एक महामेरू, लातूरने महानायक आणि महाराष्ट्राने एक सच्चा काँग्रेसजन गमावला आहे... निलंगेकर कुटुंबाच्या या दुःखाच्या क्षणी आम्ही  संपूर्ण  देशमुख कुटुंबीय त्यांच्या समवेत आहोत. त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. निलंगेकर कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती प्रदान करावी, अशी ईश्वराकडे मी प्रार्थना करतो आहे. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांना पुनश्च एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आहे असेही त्यांनी या शोकसंदेशात म्हटले आहे.

-----------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या