शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणांमध्ये आत्मनिर्भर बनावे - बिडबाग

 शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणांमध्ये  आत्मनिर्भर बनावे - बिडबाग





उस्मानाबाद ( जिल्हा प्रतिनिधी - तौफिक कुरेशी )

सोयाबीनचे दर्जेदार बियाणे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचे किडींपासून संरक्षण करण्यासाठी कीटकनाशकांचा  वापर करण्याबरोबरच ते पीक पूर्णतः परिपक्व झाल्यानंतरच त्याची कापणी करणे आवश्यक आहे. तसेच कृषी विभागाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन केल्यास निश्र्चितच दर्जेदार बियाणे तयार होते. त्यामुळे जास्तीत जास्त  शेतकऱ्यांनी या नामी सुवर्णसंधीचा फायदा घेऊन बियाणांबाबतीत आत्मनिर्भर बनावे असे आवाहन लोहारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी केले.

पुढील वर्षी सोयाबीन बियाणांची होणारी कमतरता आणि त्याची गुणवत्ता पाहता शेतकऱ्यांनी पुढील हंगामात पेरणीसाठी लागणारे बियाणे हे घरच्या घरीच तयार करून सुरक्षित ठेवावे यासाठी शेतकऱ्यांना शेतीशाळाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे.

पुढील वर्षीपासून बियाणे उत्पादन व विक्री करणाऱ्या कंपन्यांनी महाराष्ट्रामध्ये बियाणे विक्री न करण्याचा व न पुरविण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी स्वतः पर्याय निर्माण करण्याबरोबरच आत्मनिर्भर बनावे लागणार आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने पावले उचलली असून

यासाठी  दि.१० सप्टेंबर रोजी लोहारा तालुक्यातील बेलवाडी येथे  शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी

 शेतकऱ्यांनी शास्त्रीय पद्धतीने  दर्जेदार बियाणे कसे तयार करावे ? या बाबत उपस्थित शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, यासाठी ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येत असून या समितीचे सरपंच हे पदसिद्ध अध्यक्ष असणार असून त्या गावातील तीन प्रगतशील शेतकरी हे सदस्य व सदस्य सचिव म्हणून संबंधित गावचे कृषी सहाय्यक हे काम पाहणार आहेत.  

 यावेळी कृषी सहाय्यक ओम पाटील, प्रगतशिल शेतकरी राजेंद्र श्रीमंत शिंदे, विजय पंढरीनाथ शिंदे, राजकुमार माणिक राठोड, नेताजी कमलाकर शिंदे, दगडू पुंडलिक जाधव, आबाजी गेंदेव जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या