*कोरोनाचा खोटा रिपोर्ट देणाऱ्या हॉस्पिटल आणि लॅब वर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा-दिपक कांबळे*
सातारा ,दिनांक-१२ सप्टेंबर ( विशेष प्रतिनिधी)
कोरोनाचा खोटा रिपोर्ट देणाऱ्या हॉस्पिटल आणि लॅब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांची मान्यता रद्द करावी अशी मागणी माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.दिपक कांबळे यांनी मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे.रोज हजारोच्या पटीत रुग्ण सापडत आहेत आणि शेकडो लोक कोरोनाने मृत्यूमुखी पडत आहेत,शासन पण कोरोना आटोक्यात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत,पण याला काही खाजगी हॉस्पिटल आणि लॅबवाले खो घालत आहेत, खाजगी हॉस्पिटलमध्ये आणि लॅबमध्ये कोरोना टेस्ट केली तर बऱ्याच वेळा रिपोर्ट खोटा दिला जातो कारण काही हॉस्पिटलचे या खाजगी लॅबशी आर्थिक साटेलोटे असते.रिपोर्ट खोटा द्यायचा आणि अमुक हॉस्पिटलमध्ये दाखल व्हा असे लॅबवाल्या कडून पेशंट ला सांगितले जाते, गेले काही दिवस या कोरोनाचा बाजार झाला आहे.शासनाने अधिग्रहित केलेली काही हॉस्पिटल पेशंटला सरळ सरळ सांगतात की अमुक लॅब मध्येच टेस्ट करा तरच तुम्हाला आमच्याकडे दाखल केले जाईल असे सरळ धमकीवजा इशारा देतात.या कोरोनाच्या कालावधी मध्ये खाजगी हॉस्पिटल आणि लॅबचा सुळसुळाट झाला आहे, जिकडे तिकडे कमिशन राज बोकाळला आहे.हे खाजगी हॉस्पिटल आणि लॅबवाले पैश्यासाठी माणुसकीचा गळा दाबत आहेत.साधी सर्दी झाली , पाय दुखला ,गुडघे दुखले तरी त्या पेशंटचा रिपोर्ट लगेच पॉझिटिव्ह दिला जातो आणि त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करा असे सांगितले जाते.
परंतु या लॅबच्या खोट्या रिपोर्ट देण्यामुळे गरीब लोकांना मरण यातना भोगाव्या लागत आहेत,कारण जिथे एकवेळच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे तिथे या कोरोनाचा सामना करण्यासाठी लाखो रुपये कुठून आणावे ? हा प्रश्न गरीब लोकांना पडत आहे.यासाठी शासनाने योग्य त्या उपाय योजना करन कोरोनाचा बोगस रिपोर्ट देणाऱ्या हॉस्पिटल आणि लॅब वर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांची मान्यता रद्द करावी आणि गोरगरीब जनतेला न्याय द्यावा अन्यथा माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समिती तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिपक कांबळे यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.