औशाचे सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड ;
औसा शहाणपणाला अक्षरशः पोरका झाला ....!
----------------------------------------------------------
औशाचे माजी नगराध्यक्ष तथा एक सुसंस्कृत नेते अँड.मुजिबोद्दीन पटेल यांचे आज दुःखद निधन झाले.पटेल साहेबांच्या निधनाचे वृत्त संपूर्ण औसा तालुक्याला वेदना देणारेच.कारण पटेल साहेबांच्या रुपाने औशाच्या जून्या पिढीतला एक सालस आणि अभ्यासू नेता काळच्या पडद्याआड गेला.मडिवाळप्पा उटगे , मलिनाथ महाराज , शिवशंकरप्पा उटगे , एन.बी.शेख .अँड.एस.एस.पाटील , ञिंबकदास झंवर असे जूने जाणते आणि कर्ते नेते एका पाठोपाठ एक असे निघून गेले.ज्यांनी औसा घडवला , वाढवला , औशाला स्वतंत्र अशी ओळख दिली , असे अत्यंत आदरणिय नेते आमच्यात उरले नाहीत.राजकारणात आणि सामाजिक जिवनात , अँड.मुजिबोद्दीन पटेल हे अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचे नाव होते.त्यांचा सल्ला घेतल्या शिवाय अर्ध्या औशाचे पान हलत नव्हते .शिवराज पाटील आणि स्व.विलासराव देशमुख यांचे ते खास विश्वासू सहकारी.दोन्ही नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केले.औसा नगर परिषदेचे ते जवळपास 22 वर्ष अध्यक्ष राहीले.शहराच्या विकासात त्यांचा मोठा आणि मोलाचा वाटा राहीला.दोन वेळा त्यांनी विधासभा निवडणूकाही लढविल्या.
वकील साहेबांचे राजकारणात कांही खास गूण होते.ते विरोधकाला नेहमी आपल्या जवळ ठेवीत आणि स्वकियाला उत्तम काम लावीत.वकील साहेबांनी कोणाला कुठे ठेवले आहे आणि कोण नेमके काय करीत आहे , याचा थांगपत्ता कोणाला नसे.त्यामुळे बावीस वर्षात कोणीही नगराध्यक्ष पदावर साधा हक्क सांगितला नाही.नगरपालीकेचे तिकीट वकील साहेबांच्या मर्जीवर असे.आणि वकील साहेब 14 समर्थक आपले ठेवूनच बाकी मंडळीना तिकिट देत.त्यामुळे कोणाचाही डोळा नगराध्य पदाच्या खुर्ची कडे जात नसे.कांही आगाव नगरसेवकही वकिल साहेबच निवडून आणित.पण त्यांना असे कांही काम देत की , पाच वर्षे असे आगाव नगर सेवक तारखा पेशा करण्यातच गुंतून पडत.अत्यंत मितभाषी परंतु खूप अभ्यासू असे त्यांचे नेतृत्व होते.जिल्हाधीकारी असो , आयुक्त असोत की नगरविकास खात्याचे सचिव अथवा मंञी , वकील साहेबांच्या म्हणण्याला या सर्वाकडे विषेश महत्त्व असायचे.सरकारकडून निधी कसा आणावा , आणलेला निधी कसा माफ करुन घ्यावा , यात वकील साहेबांचा खूप हातखंडा होता.
औसा हे हिंदू मुस्लिम आबादीचे शहर.संपूर्ण देशात अनेकदा हिंदू मुस्लिम दंगली झाल्या माञ वकील साहेबांनी कधीही औशाला गालबोट लागू दिले नाही.एक सामाजिक सलोखा राखला.शांतता व सुव्यवस्था राखली.अगदी बाबरी प्रकरणीही , हे शहर शांततेच ठेवले.
वकील साहेब , झंवर साहेब , हे माझे खास आवडते नेते.आणि मी त्यांचा लाडका मिञ.1993 ते 2019 पर्यंत असा एकही दिवस गेला नाही , ज्या दिवसी आम्ही भेटलो नाही.राजकारण काय असतं , ते कसं करावं , का करावं , याचा पक्का मसूदा उभय नेत्याकडे असायचा.त्यांची प्रत्येक कृती जनहीताची असायची .गरीब माणूस हा त्यांच्या राजकारणाचा केंद्र बिंदू असायचा.गरीबांच्या कल्याणासाठी त्यांचे अविरत कार्य सुरु असायचे.वकील साहेबांचे काम पहाटे पाचला सुरु व्हायचे .पहाटे वकिल साहेबाकडे साधारण सर्व वार्डातले मिळून वीस ऐक नागरिक यायचे आणि गत दिवसभराच्या घडामोडी वकील साहेबांना सांगायचे .या घडामोडी केवळ राजकीयच नसायच्या तर सर्व प्रकाराच्या असायच्या.त्यामुळे दुसऱ्या दिवसी निवाड्याला येणारी प्रकरणे वकील साहेब सहजतेने हातावेगळे करायचे.
राजकारण आणि त्यातले खाचखळगे ,यात वकील साहेब मास्टर होते,पुढे जेंव्हा राजकारणात जात आणि पैसा आला तेंव्हा वकील साहेबही हतबल झाले.मी आणि शाम कुलकर्णी यांच्या कडे ते आपली नाराजी बोलून दाखवायचे.' ये सब क्या चल रहा है , हमने जिंदगीमें कभी ऐसा नहीं देखा ' असं हतबल होऊन म्हणायचे.कै.विजय वळसंगे , कै.चंद्रशेखर राचट्टे , कै.एन.बी.शेख , विद्यमान नगराध्यक्ष अफसर शेख यांनी मोठ्या शिताफीने वकील साहेबांच्या नेतृत्वाला सुरुंग लावले.पण जनमाणसातल्या त्यांच्या अभ्यासू प्रतिमेला आजवर कोणी धक्का लावू शकले नाही.
असा हा सुसंस्कृत आणि सालस नेता आज आम्हा औसेकरांना सोडून काळाच्या पडद्याआड गेला .
मी व्यक्तिशः आणि मनोगत परिवाराच्या वतिने अँड,मुजिबोद्दीन पटेल साहेबांना अश्रू चिंब श्रद्धांजली अर्पण करतो.एखाद्या गावात चार शहाणी माणसं असतात , त्यांच्या विचारावर गावगाडा चालत असतो.अशी शहाणी माणसं एक एक करुन आमच्यातून निघून जात आहेत.त्यापैकी अँड.मुजिबोद्दीन पटेल एक होत.
-- राजू पाटील , औसा.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.