कोरोनासोबत जगण्यासाठी ‘एसएमएस’ महत्वाचे...
हिंगोली, दि.5: शेख इमामोद्दीन
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ‘कोरोनाशी दोन हात’ या कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथ्था यांनी ‘कोरोनासह जगण्याची तयारी’ याविषयी केलेल्या चर्चेचा चौथा भाग आज प्रसारीत होत आहे. त्याचा संपादीत अंश.
श्री. शांतीलाल मुथ्था : कोरोनासोबत जगण्याच्या संदर्भामध्ये लोकांना काय मार्गदर्शन कराल?
आरोग्यमंत्री राजेश टोपे :सध्या आपल्याकडे कोरोनावर प्रतिबंधक लस नाही. लस येईपर्यंत किती महिने लागतील, सांगता येत नाही. लॉकडाऊन करत राहिलो तर आपल्या अर्थव्यवस्थेचं काय होईल? ज्यांचं हातावर पोट आहे त्याचं काय होईल? बिझनेस हाऊसेस, व्यवसाय बंद होतील. ज्येष्ठ उद्योगपती श्री. रतनजी टाटा यांनी स्पष्ट सांगितलं आहे की “हे वर्ष नफा-नुकसानीचा विचार करायचं नाही. हे वर्ष फक्त जगण्यासाठी आपण जगा.” आता आपल्याला कोरोनाबरोबर जगायचंच आहे त्या दृष्टीकोनातून शिक्षित व्हावं. लॉकडाऊन हे तात्पुरतं पॉज बटन आहे. आता अनलॉक केलेलेच आहे.
शाळा सुरू नाहीत काही प्रमाणात मॉल्स सुरू नाहीत. टप्याटप्याने काहीकाही गोष्टी शिथील केल्या जातील, हे करीत असताना आपल्याला एसएमएस (एस म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, एम म्हणजे मास्क, एस म्हणजे सॅनिटायजर म्हणजेच सॅनिटाईज्ड हॅण्डस्.) पद्धतीने जगावे लागेल. आपला जो काही व्यवसाय, नोकरी असेल ती करताना काळजी घ्या. कोमॉर्बीड लोकांनी जरा अधिक काळजी घ्या. ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी. अनावश्यक बाहेर जाऊ नका. आपण सर्वांनी या गोष्टींचं शिक्षण घेऊन, त्याचं ज्ञान मिळवून कुठल्याही परिस्थितीत आपण जे काही काम करतो त्यात एसएमएस पद्धतीचा वापर केला पाहिजे.
श्री. शांतिलाल मुथ्था : सगळं सुरू झाल्यानंतर गर्दी झाल्यावर त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतील का?
आरोग्यमंत्री राजेश टोपे : गर्दीमुळे प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. परंतु आपण गर्दीत कसं रहायचं? त्यातला महत्वाचा मंत्र आहे की, एसएमएस पद्धतीने आपल्याला राहावं लागेल. त्यासाठी आपण शिस्त अंगिकारली पाहिजे.
श्री. शांतिलाल मुथ्था : आपल्याकडे सणांचा खूप मोठा उत्साह असतो विविध धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभ असं आपल्या भारतातलं कल्चर हे सोशलायझिंगवरती आहे. पुढच्या काळात या सर्व गोष्टींना मोठ्या प्रमाणावर ब्रेक बसेल असं काही आहे का ?
आरोग्यमंत्री राजेश टोपे : आपल्याला असं थांबून तर चालणार नाही. लस आल्यानंतर मला नाही वाटत काही भीती राहील. आपल्याला सर्व गोष्टींसाठी खुलं करून चालणार नाही. त्यामुळे थोडं टप्प्याटप्प्याने करूया. हे सगळं पाळलं तर संसर्ग टळेल आणि संसर्ग टळला तर आपल्याला यावर नियंत्रण आणता येईल. त्यामुळे शिस्त पाळणे फार महत्वाचं आहे.
श्री. शांतिलाल मुथ्था : शासन म्हणून आपण सगळं अनलॉक करू शकाल. परंतु एक नागरिक म्हणून मला कुठं जायचं, कुठं नाही, कुठं टाळू शकतो, कुठं टाळू शकत नाही.... मला असं वाटतं की जनतेने काही गोष्टीत स्वतःहून शिस्त पाळावी. आपण जनतेला काही प्रबोधन दिलं तर स्वयंशिस्तीने लोकांचा स्वतःचा फायदा होऊ शकेल आणि तोच खऱ्या अर्थाने कोरोना नियंत्रणासाठी उपयोगी ठरू शकेल.
आरोग्यमंत्री राजेशजी टोपे : “मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक”. सगळ्याच गोष्टींवर मनाचा ब्रेक लावणं गरजेचं आहे. म्हणजेच अनावश्यक ठिकाणी जायचे टाळले पाहिजे. सीनियर सिटीझन्सनी, कोमॉर्बीड लोकांनी गर्दीत जाणे टाळावे. आम्ही शाळासुद्धा उघडल्या नाहीत, सतर्कता म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी ओपन करत नाही. पण एसएमएस पद्धतीचा वापर करून जरूर आपलं कार्य करावं आणि जेवढं टाळता येऊ शकत असेल त्या अनावश्यक गोष्टी जरूर टाळाव्यात.
श्री. शांतिलाल मुथ्था : या शैक्षणिक वर्षात जून महिन्यापासून आतापर्यंत शाळा बंद आहेत. पुढच्या काळात त्या किती दिवस बंद राहतील? कदाचित एक शैक्षणिक वर्ष जाऊ शकतं. शाळा कधी सुरू होतील, सुरू झाल्या तर त्यासाठी खबरदारी कशी घ्यावी लागेल?
आरोग्यमंत्री राजेश टोपे : शाळा सध्या बंद आहेत परंतु शिक्षण चालू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट फोन ज्यांच्याकडे आहे ते लोक ऑनलाइन स्कुलिंग करू शकतात. जिल्हा परिषदेच्या शाळेत ऑनलाइन स्कूलिंग सर्वत्र अजून चालू नाही. काही अडचणी आहेत. ऑनलाइन स्कूलिंग १०० टक्के परिणामकारक आहे असे मला वाटत नाही आणि हे आपल्याला कायमस्वरूपी ऑनलाइन ठेवता येणार नाही. त्यामुळे लस येईपर्यंत हे असंच सुरू ठेवावं लागेल.
श्री. शांतिलाल मुथ्था : जिल्हा परिषदेच्या ६७००० शाळा महाराष्ट्रामध्ये आहेत. प्राथमिक शाळेमध्ये ४४ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे कशापद्धतीने पालक, विद्यार्थी, शिक्षक तसेच सिस्टिम सक्षम आहे? शाळेमध्ये प्रत्यक्ष संवाद करणं हा एक महत्वाचा भाग आहे. त्याच्या शिवाय विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेऊ शकत नाहीत. डिसेंबरपर्यन्त लस आली तरी हा बॅकलॉग भरून काढणं या संदर्भातला प्रयत्न करण्यासाठी शासनाकडून निश्चितच मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणे गरजेचं आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे : मुलांचं नुकसान निश्चितच होऊ नये. त्यांचं वर्ष वाया जाता कामा नये. जो काही गॅप पडला आहे, तो भरून काढण्यासाठी शिक्षणाची पद्धत असो, शिकवण्याची पद्धत असो किंवा कंटेन्ट मध्ये बदल करायचे असोत, शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षण थांबता कामा नये, याची काळजी आपल्याला घ्यावीच लागेल.
श्री. शांतिलाल मुथ्था :२०१५ मध्ये, ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडायला लागला तेव्हा, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या १००० मुला-मुलींना मी शिक्षणासाठी पुण्यामध्ये आणलं. त्यांच्या वडिलांनी आत्महत्या केलेली होती. माझा मुद्दा असा आहे सर, सध्या मुलं गेली सहा महिने घरामध्येच बसलेली आहेत. लॉकडाऊन पाहिलेला आहे, दूरदर्शनवर, चॅनेलवर सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. घराच्या बाहेर त्यांना पडता आलेले नाही, लोकांचे मृत्यू त्यांनी डोळ्यांनी बघितलेले आहेत. यांच्या मनावरती खूप मोठा परिणाम या संपूर्ण प्रक्रियेचा झालेला आहे. मी स्वतः या झालेल्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी याच्यावर गेल्या २-३ महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे : मुलांची काळजी घ्यावीच लागणार आणि आपल्याला त्यांचे काऊन्सिलिंग करावे लागणार आहे. त्यांच्या पालकांचेसुद्धा काऊन्सिलिंग करावे लागेल. “महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना” उपलब्ध आहे. १००० हॉस्पिटल्स आहेत, ज्यामध्ये आपण १०० टक्के कॅशलेस सेवा, एक रुपया न घेता या सगळ्या सुविधा देऊ शकतो. राज्य सरकारचा एकच फोकस राहिलेला आहे की सामान्य माणूस हा आमच्या डोळ्यासमोर आहे, सामान्य गरीब पेशंट डोळ्यासमोर आहे आणि त्याचे हित आपल्याला कसं जपता येऊ शकेल ते जपण्याच्या दृष्टीकोनातूनची धोरणं आखण्यात आलेली आहेत.
मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दररोज रात्री ९.०० वाजता ही चर्चासत्र मालिका प्रसारीत होत आहे.
· रविवार दि. ६ सप्टेंबर रोजी कोरोना: प्रतिकारशक्ती व इच्छाशक्तीचे महत्व
· सोमवार दि. ७ सप्टेंबर रोजी कोरोना: प्लाझ्मा व सिरो सर्व्हेलन्स या विषयांवर चर्चा होणार आहे.
अजय जाधव..विसंअ...५.९.२०२०
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.