*२९ सप्टेंबर जागतिक हृदय दिन*
हृदयविकारांचे स्वरुप वेगाने बदलत आहे, त्याची तीव्रताही वाढते आहे. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव या कारणांसोबत सातत्याने वाढता ताणतणाव हे कारणही हृदयविकार बळावण्यासाठी महत्त्वाचे आहे. दररोज हजारो लोक हार्ट अटॅकने मरतात. त्यामूळे हृदयाची काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे. हृदयाची काळजी घ्यायची असेल तर नेमके काय करायला हवे ?
२९ सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी ‘हृदय रोग टाळण्यासाठी आपल्या हृदयाचा वापर करा’ असा संदेश वर्ल्ड हेल्थ फेडरेशन ने दिला आहे. या अनुशंगाने आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी काही महत्वपूर्ण माहिती.
*हृदयरोगाचं प्रमाण वाढलं आहे का...?*
हृदयरोगाचं प्रमाण एकूणच भारतामध्ये दिल्ली, मुंबईसारख्या महानगरांमध्येच नाही तर प्रत्येक शहरात वेगाने वाढत आहे. कर्करोग, संसर्गजन्य आजारांइतकंच हृदयरोगाचं प्रमाणही झपाट्याने वाढलं आहे. हृदय विकाराणे मरणाऱ्यांची संख्या इतर आजारांच्या तुलनेत जागतिक स्तरावर सर्वात जास्त मानली जाते. या मागील महत्त्वाची कारणंही समजून घेण्याची गरज आहे. ही वाढ अचानक झालेली नाही. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, सातत्याने बाहेरचे पदार्थ खाण्यामुळेही हृदयरोगाचं प्रमाण वाढलं आहे. या आजारांतील गुंतागुंतही पूर्वीपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे हृदयविकारांचं बदलतं स्वरूप लक्षात घ्यायला हवं.
*मधुमेह असलेल्या रुग्णांनी घ्यावयाची काळजी...*
मधुमेहींमध्ये हृदयरोग वाढण्याची निश्चितच शक्यता असते. गेल्या काही वर्षांत मधुमेहाचं प्रमाण वाढलं आहे. या आजारामुळे शरीराच्या इतर अवयवांवर परिणाम होतो. मूत्रपिंडाचं कार्य बिघडतं, दृष्टीवर परिणाम होतो, पायांवर, त्वचेवर परिणाम होतो तसाच हृदयाच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. त्यामुळे मधुमेहावर उपचार घेताना हृदयाचीही काळजी घेण्याची गरज आहे. प्रत्येक मधुमेहींनी वर्षातून एकदा तरी हृदयविकारतज्ज्ञांकडे जाऊन वैद्यकीय तपासणी करून घ्यायला हवी. त्याबद्दल जाणीवजागृती करण्याची गरज आहे. मधुमेह असलेल्या २० ते २५ टक्के रुग्णांमध्ये हृदयविकाराची लक्षणं ही सौम्य स्वरुपाची असतात, ती थेट दिसून येत नाहीत. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
*हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असलेले विविध प्रकारचे व्यायाम...*
वीस ते पंचवीस मिनिटं नियमितपणे चालण्याचा व्यायाम हा हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी गरजेचा आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारचाच व्यायाम करायला हवा असं बंधन नाही. संतुलित आहार, योग्य झोप आणि तणावमुक्त राहिल्याने हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. विविध प्रकारच्या व्यायामांची वा कृत्रिम पोषणमूल्यं घेण्याची त्यासाठी गरज नाही. शरीराला गरजेच्या असणाऱ्या सहा ते सात तासांच्या झोपेमध्ये शरीराचं कार्य सुनियंत्रित ठेवलं जातं. या कालावधीमध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी गरजेच्या असणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांची निर्मिती होते. ताणतणावामुळे झोप विस्कळीत होते, त्यामुळे हृदयाचं कार्यही विस्कळीत होतं.
*हृदयाचं आरोग्य जपायचं असेल तर काय काळजी घ्यायला हवी...?*
कोणत्याही प्रकारचं व्यसन टाळा. पुरेशी झोप घ्या. पोषक आहारावर भर द्या. उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल यांच्या चाचण्या वेळेवर करा. व्यायामाला नकार देऊ नका. सर्वात मुख्य म्हणजे काहीही होणार नाही, या भ्रमात राहू नका. डॉक्टरांकडे वेळेवर जा. छातीत दुखत असेल वा कोणतंही लक्षण दिसत असेल तर केवळ एसिडिटी म्हणून दुर्लक्ष करून वाट्टेल त्या गोळ्या घेऊ नका. योग्य वेळी केलेल्या निदानामुळे योग्यवेळी उपचार मिळण्यासाठी मदत होते याचा केव्हाही विसर पडू देऊ नका.
३० वर्षानंतर रक्तदाबाची नियमितपणे तपासणी केली पाहिजे.
लठ्ठपणा असलेल्यांनी अशावेळी स्वत: ची काळजी घेणे आवश्यक आहे.
हार्ट अटॅक शी संबंधित रुग्णांनाही सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
सध्याच्या युगात अल्कोहोल हे फॅशन मानले जाते. परंतु धूम्रपान आणि दारू पिण्याच्या सवयीमुळे हृदयाला नुकसान पोहोचते. हे टाळण्यासाठी आपले जीवन हे नशामुक्त आणि औषधमुक्त असणे आवश्यक आहे.
तुम्ही जर हृदय विकाराचे रुग्ण असाल तर तुमच्यासाठी योगा करणे फायद्याचे ठरेल. आपण कमीत कमी अर्धा तास योग करू शकता. हे कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, तणाव यासह अनेक समस्या काढून टाकते. तसेच, रक्ताभिसरण देखील चांगले राखण्यास मदत करते.
*कोविड-१९ मध्ये घ्यावयाची काळजी*
कोरोनाच्या संकटात हृदयविकार गंभीर झालेल्या रुग्णांत २०% वाढ झाल्याचे दिसून आले आहे. काही आजार असलेल्यांना कोविड-१९ या आजाराचा जास्त धोका आहे. यामध्ये मोठी संख्या हृदयरोगींची आहे. हृदयरोग असलेल्यांना सामान्यांप्रमाणेच कोविडच्या संसर्गाचा धोका आहे. तो होऊ नये म्हणून सर्वसामान्यांपेक्षा जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. कोविड-१९ प्रत्येक अवयवावर परिणाम करतो त्याची जास्त बाधा फुफ्फुसाला तर त्या खालोखाल हृदयाला धोका असतो. त्यामुळे हृदयरोग असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हृदयरोगतज्ज्ज्ञ डॉ. पंकज हरकूट आणि कन्सल्टन्ट इन्टेन्सिव्हिस्ट डॉ. सोहल पराते यांनी नुकत्याच झालेल्या इंडियन मेडिकल असोसिएनशच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोविड संवाद या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात डॉ. पंकज हरकूट आणि डॉ. सोहल पराते यांनी मार्गदर्शन केले होते.
- प्रा. सय्यद अब्दुल अजीम अ.
प्राध्यापक
एन.बी.एस. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी
औसा, जि.- लातूर
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.