वैद्यकिय प्रवेशातील ७०:३० प्रादेशिक आरक्षण शासनाने लागू करण्याची चूक करून एवढी वर्ष मराठवाड्यावर का अन्याय केला ?
- सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांचा सवाल
लातुर : दि. ९ - मराठवाड्यातील गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे ७०:३० चे चुकीचे प्रादेशिक आरक्षण लागू करून तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने मराठवाड्यावर का अन्याय केला ? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी आघाडी सरकारला विचारला आहे. हे चुकीचे आरक्षण जाहीर करून तत्कालीन सरकारने कोणाच्या फायद्यासाठी मराठवाड्यावर अन्याय केला आहे ? एवढी वर्षे हे आरक्षण चालू ठेवून मराठवाड्यातील गुणवान विद्यार्थ्यांच्यावर मोठा अन्याय झालेला आहे.
हा होत असलेला अन्याय बंद करावा आणि ७०:३० चा निर्णय रद्द करावा अशी मागणी मराठवाड्यातील विविध संघटना कडून सातत्याने होत होती. चालू पावसाळी अधिवेशनाचे पहिल्या दिवशीच या मागणीसाठी लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन विधिमंडळाच्या प्रवेश द्वारावर जोरदार घोषणाबाजी केली. अखेर या लढ्याला यश आले. विरोधी पक्षाच्या आमदारानी ७०/३० चा निर्णय रद्द करावा म्हणून शासनाला दिलेल्या पत्राच्या दबावामुळे सरकार नमले. आणि मंगळवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना ७०:३० कोटा पद्धत रद्द केल्याची घोषणा करावी लागली. अखेर वैकुंठवासी विलासराव देशमुख यांनी घेतलेला ७०/३० चा निर्णय पुत्र अमित देशमुख यांनी रद्द केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला ७०/३० चा निर्णय शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडी सरकारने बदलला. उशिरा का होईना आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी शासनाचे अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.