कोरोनाशी दोन हात’ भाग पाचवा - मुलाखत · ‘पुन्हा सगळे सुरळीत होईल

 कोरोनाशी दोन हात’

भाग पाचवा - मुलाखत

·        ‘पुन्हा सगळे सुरळीत होईल’

 

   हिंगोली, दि.6:*दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ‘कोरोनाशी दोन हात’ या चर्चासत्र मालिकेच्या पाचव्या भागात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथ्था यांनी ‘कोरोना: प्रतिकारशक्ती व इच्छाशक्तीचे महत्व’ याविषयी संवाद साधला. हा भाग आज प्रसारीत होत आहे. त्याचा संपादित अंश.*

 

            श्री. शांतिलाल मुथ्था: प्रतिकार शक्ती जर चांगली असेल तर आपण कोरोनावर मात करू शकतो. योग, आयुर्वेद, होमिओपॅथी, प्राणायाम यासारख्या गोष्टी भारतामध्ये अनादी काळापासून आहेत. या पद्धतींचा उपयोग, गेल्या  चार  महिन्याच्या लॉकडाऊनमध्ये  लोकांनी मोठ्या प्रमाणावर केला आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासंदर्भामध्ये आपण काय प्रबोधन कराल?

 

            आरोग्यमंत्री राजेश टोपे: प्रत्येकाने आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवली पाहिजे. कोरोनाच काय तर कुठलच इन्फेक्शन तुम्हाला काही करणार नाही. योग्य तो आहार, पुरेशी झोप आणि योग्य व्यायाम या सगळ्या गोष्टी करायलाच पाहिजेत. जे सिजनल इन्फेक्शन असतात जसे डेंग्यू व मलेरिया या सगळ्यांवर आपल्याला मात कारायची असेल तर आपली प्रतिकारशक्ती चांगलीच पाहिजे. आयुष, योगा, प्राणायाम, व्यवस्थितपणे आहार घेणं या सगळ्या गोष्टींचं खूप महत्व आहे. कोरोना काळात जास्त काळजी घ्यायची असेल तर  वाफ घेणं, गरम पाणी पिणे, काढा घेणं यासुद्धा  महत्वाच्या बाबी आहेत.

 

श्री. शांतिलाल मुथ्था: बाहेरच खाण्यामुळे या सगळ्या गोष्टींचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे लाईफ स्टाईल बदलली जाऊ शकेल का? लोकांची लाईफ स्टाईल बदल करणे... हे जरा मला अवघड वाटतं.

 

            आरोग्यमंत्री राजेश टोपे: प्रत्येकाला त्याची जीवनशैली अंगवळणी पडलेली असते. त्याचा माईंड सेट तयार झालेला असतो. बाहेर जाऊन खाणं ह्यात आनंद वाटतो किंवा मोठेपणा वाटतो. आता आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी शिक्षित व्हावंच लागेल. नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे मधुमेह, रक्तदाब, कर्करोग ज्यांच्यामुळे संसर्ग होत नाही, पण हे झाल्यानंतर आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणावर अशक्तपणा निर्माण होऊ शकतो. त्यासाठीसुद्धा आपल्याला खाण्या-पिण्याच्या सवयी नीट समजून घ्याव्या लागणार आहेत. जिभेवर आणि मनावर ताबा हे सगळं प्राणायामाने, योगासनांनी योग्य पद्धतीने शिस्तबद्ध आयुष्य जगूनच करावे लागणार आहे. तर आणि तरच आपली प्रतिकारशक्ती चांगली राहू शकेल.

 

श्री. शांतिलाल मुथ्था: लोकांना जंक फुडची सवय लागली आहे. त्याने त्रास होतो, हे सांगण्या ऐवजी  स्वतःच जंक फुड मागवून मुलांच्या बरोबर ते खातात. त्यामुळे आपण आपल्या भावी पिढीला जास्त निरोगी बनविण्याऐवजी अशाप्रकारे आरोग्य विषयक अडचणी निर्माण करीत आहोत असं वाटत नाही का ?

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे: जंक फुड ठराविक प्रमाणापेक्षा नक्कीच घातक आहे. या बाबतीतसुद्धा सर्वांनी शिक्षित व्हायला पाहिजे. जंक फुड खाण्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. त्याला आता पर्याय नाही.

 

श्री. शांतीलाल मुथ्था: कोरोनाबरोबर जगण्यामध्ये इच्छाशक्ती खूप महत्वाची आहे. ज्याची इच्छाशक्ती मजबूत असेल त्याला कुठलाही आजार असो..कितीही वय असो.. काहीही असो.. तो त्याच्यावर मात करू शकतो.

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे:  सकारात्मक दृष्टीकोन आणि तुमची इच्छाशक्ती ह्या दोन गोष्टी तुमची  ताकद आहे. ज्यामुळे तुम्ही आज या वयामध्येसुद्धा फिट आहात. बऱ्याचदा ताण खूप असतो."तणावाचे  व्यवस्थापन" याविषयावर आरोग्य विभाग सुद्धा निश्चितप्रकारे काम करीत आहे.

 

            श्री. शांतीलाल मुथ्था: फक्त स्वतःचा एखाद्या  गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि स्वतःची इच्छाशक्ती हे जर Strong असेल तर कुठलाही माणूस कुठल्याही गोष्टीवर मात करू शकतो.

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे: परसुएशन (Persuasion)  करत राहणं म्हणजे समजा तुम्ही एकदा जरी चुकलात तर परत आपण दुरुस्त करायचं आणि ती गोष्ट परत करायची. सातत्याने परसुएशन केल्याने सुद्धा आपल्याला या सगळ्या गोष्टीत यश मिळते.  सातत्याने मन वळवून आणि सकारात्मकता व इच्छाशक्तीच्या बळावर आपल्याला पुढे जावे लागेल आणि कोरोनासारख्या महामारीवर तर आपणाला विजय मिळवायचाय शिवाय जीवनातसुद्धा आपल्याला यशस्वी व्हायचे आहे.

 

श्री. शांतीलाल मुथ्था: कोरोनामुळे लोकं घराच्या बाहेर पडू शकत नाहीत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. व्यवसाय बंद झाले. काहींचे पगार निम्म्यापेक्षा कमी झाले आहेत. अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारे नुकसान सहन करावं लागलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीवर परिणाम झाला आहे. कोरोनासह जगण्यासाठी एकीकडून मला पैसा नाही आणि दुसरीकडून मला कोरोनाशी लढायचे आहे माणूस शेवटी वैतागतो. तर या वैतागण्यापासून माणसाला कसं दूर ठेवले पाहिजे ?   

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे:  यासाठी समुपदेश (counselling) करणे हा सध्याचा महत्वाचा विषय आहे. लोकांना हे सांगणे गरजेचे आहे की आपल्या जीवनात आपण पुन्हा सगळे कमवू शकतो. नोकरी परत मिळेल. तुमच्या हातात स्कील आहे. तुझ्या जवळ ज्ञान आहे. तुला सगळे परत मिळेल. बुद्धिमत्ता असेल तर तुझा व्यवसाय पुन्हा उभा राहील. कुठेही निराश होता काम नये. खचून जाता काम नये. हिमतीने उभे राहिले पाहिजे. खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. स्वबळावर पुढे पुढे जायला पाहिजे. मला वाटतं सकारात्मक राहणे हा जीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे. लढण्याची जिद्द, चिकाटी.. मला वाटतं... याच विश्वासावर आज कितीही वाईटातील वाईट प्रसंगातूनही मी पुन्हा उभा राहू शकतो, हीच मानसिकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

 

            श्री. शांतिलाल मुथ्था: प्रत्येक डिझास्टरनंतर लोकांना अनेक नवीन संधी उपलब्ध होतात किंवा अनेक लोकं नव्याने उभी राहतात. तसं या संकटातून बाहेर पडत असतानासुद्धा, याच्यामधून नवीन काहीतरी लोकांना शिकायला मिळेल अशाप्रकारचे आपल्याला काही वाटते का ?

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे: आपल्याला कोरोनाने सुदृढ राहायला शिकवले. सुदृढ रहा, निरोगी रहाल तर असं कुठलही संकट अचानक उद्भवलं तरी ते तुम्हाला हात लावू  शकणार नाही. तसेच मानसिकदृष्ट्या सुद्धा आपल्याला सशक्त रहावे लागेल. म्हणून प्राणायाम असेल, आध्यात्मिक विषय असेल, ज्याच्यामुळे आपल्या मनाची मशागत होते. मनाची मशागत ही शरीराच्या मशागती इतकीच महत्वाची आहे आणि दोन्हीची मशागत झाली तर तो मनुष्य अशा कितीही संकटांवर मात करू शकतो.

 

००००

 

मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दररोज रात्री ९.०० वाजता ही चर्चासत्र मालिका प्रसारीत होत आहे. उद्या या चर्चासत्र मालिकेचा समारोप होणार असून शेवटच्या भागात  सोमवार दि. ७ सप्टेंबर रोजी  कोरोना: प्लाझ्मा व सिरो सर्व्हेलन्स या विषयावर चर्चा होणार आहे.

 

 अजय जाधव..विसंअ...६.९.२०२०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या