औसा तालुक्यात शेतकऱ्यांची रब्बीसाठी मशागतीची लगबग
औसा मुख्तार मणियार
औसा तालुक्यात सोयाबीन कापणी आणि मळणी सोबतच आता शेतकरी वर्गाची रब्बीसाठी पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहे. सप्टेंबर महिन्यातच तिसऱ्या आठवड्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकात पाणी जाऊन पिकांचे आतोनात नुकसान झाले होते. दिनांक 26 सप्टेंबर नंतर पावसाने उघड दिल्याने शेतकऱ्यांनी आहे ते पीक पदरात घेण्यासाठी सोयाबीन कापणी व मळणी करीत आता रब्बीची पेरणी करण्यासाठी पेरणीपूर्व मशागतीला सुरुवात केली आहे. यावर्षी परतीचा पाऊस समाधान कारक झाला असून सध्याही ढगाळ वातावरण असल्याने हमखास रब्बीची पिके येण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीला जोरदार प्रारंभ केला आहे. जांच्याकडे बैल बारदाना आहे ते बैलाच्या साह्याने तर अधिकात अधिक शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटर, मोगडा आणि वखरणी करून रब्बी पेरणी साठी शेत-शिवार तयार करीत आहेत. जमिनीत पुरेसा ओलावा असेपर्यंत पेरणी करण्यासाठी धडपड सुरु असून औसा तालुक्यात हरभरा सर्वाधिक शेतकरी पेरतील अशी चर्चा आहे. ज्वारी, गहू, करडी, सूर्यफूल इत्यादी पिकांची रब्बी पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागत करून खते आणि बियाणांची जुळवाजुळव करावी लागते. त्यामुळे शेतकरी पाऊस उघडताच सोयाबीन ची कापणी करून येईल त्या दराने सोयाबीन विकून आता रब्बी पेरणी करून काळ्याआईची ओटी भरण्याची तयारी चालवली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.