पारंपरिक शेतीला बगल देत पेरूच्या लागवडीतून साधला विकास; उपक्रमशील शेतकरी शिवाजी शिंदे यांची यशोगाथा

 पारंपरिक शेतीला बगल देत पेरूच्या लागवडीतून साधला विकास;


उपक्रमशील शेतकरी शिवाजी शिंदे यांची यशोगाथा








देगलूर/अमित पाटील : अस्मानी आणि सुलतानी संकटांनी शेतीची अवस्था अधिकच बिकट होत चालली असताना, निसर्गाची अवकृपा, शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे दिवसेंदिवस शेतीला अवकळा येत आहे. नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. मात्र शेतकऱ्यानी हताश न होता प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर आधुनिक पद्धतीने शेतीची कास धरली तर नक्कीच शेतीत भरघोस उत्पादन मिळू शकते. अश्याच प्रबळ इच्छाशक्तीला आधुनिकतेची जोड देत  देगलूर तालुक्यातील लोणी येथील शेतकरी शिवाजी शिंदे यांनी आपल्या चार एकर शेतात पेरू या फळाची लागवड केली आहे. यात त्यांनी आधुनिक पध्दतीचा अवलंब केला असून या पेरू लागवडीतून त्यांना यंदा विक्रमी उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे.

      देगलूर तालुक्यातील लोणी येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी शिंदे यांची देगलूर-हणेगाव या मुख्य रस्त्यालगत शेती आहे. ते आपल्या शेतात दरवर्षी पारंपरिक पध्दतीने कापूस, तूर, सोयाबीन, उडीद या प्रमुख पिकांची लागवड करीत असत. मात्र मागील वर्षी त्यांनी पेरू लागवडी बाबत माहिती मिळवून जून २०१९ मध्ये सुरुवातीला त्यांनी आपल्या दोन एकर शेतात पेरूची लागवड केली. त्यानंतर पाण्याची उपलब्धता पाहत टप्याटप्याने अजून दोन एकर पेरू लागवड केली आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना नांदेड जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने जिल्हा परिषद उपकर योजना २०१९-२० साठीच्या "एकनिष्ठ शेतकरी पुरस्काराने" सन्मानितही करण्यात आले आहे. सुरुवातीला लागवड करण्यात आलेल्या दोन एकर मधून त्यांना सुरुवातीलाच १०० क्विंटल पेरुचे उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे. तर पुढील हंगामापासून या उत्पादनात त्यांना चार पट वाढ अपेक्षित आहे. यासाठी देगलूर तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, कृषी सहाय्यक गंगाधर सुनेवाड, तसेच या भागातील प्रगतशील शेतकरी अनिल पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन लाभत आहे.

      एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीला अवकळा आली असताना लोणी येथील शेतकरी शिवाजी शिंदे यांनी मोठ्या हिंमतीने, प्रबळ इच्छाशक्ती व मेहनतीच्या बळावर फुलविलेली शेती नक्कीच हताश झालेल्या शेतकऱ्यांना आशेचा नवा किरण ठरू शकते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या