उत्तर प्रदेश सरकारने घेतला काँग्रेस नेतृत्वाचा धसका. काँग्रेस नेतृत्वाला दिलेली वागणूक लोकशाहीला काळीमा फासणारी. पीडितेस न्याय देण्यात उत्तर प्रदेश सरकारने तत्परता दाखवावी - महापौर

 

उत्तर प्रदेश सरकारने घेतला काँग्रेस नेतृत्वाचा धसका.

काँग्रेस नेतृत्वाला दिलेली वागणूक लोकशाहीला काळीमा फासणारी.

पीडितेस न्याय देण्यात उत्तर प्रदेश सरकारने तत्परता दाखवावी - महापौर विक्रांत गोजमगुंडे

लातूर /प्रतिनिधी: हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यापासून काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना रोखणार्‍या व त्यांना धक्काबुक्की करण्याची उत्तर प्रदेश सरकारची कारवाई निषेधार्ह असून सरकारने काँग्रेस नेतृत्वाचा धसका घेतल्याचे दिसून येते. अशी प्रतिक्रिया लातूरचे
महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केली. तसेच पीडितेस न्याय देण्यात सरकारने तत्परता दाखवावी असे आवाहन केले.
उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस येथील सामुहिक बलात्कारपीडित दलित तरूणीच्या कुटुंबियांना भेटून त्यांचे सांत्वन करण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी श्री राहुलजी गांधी व  प्रियंका गांधी जात होते. पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यापासून रोखणे,राहुलजी यांना पोलिसांनी धक्काबुक्की करणे आणि त्यांना अटक करणे हा संपूर्ण घटनाक्रमच अत्यंत निषेधार्ह आहे. या घटनेतील गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा व पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असताना उत्तर प्रदेश सरकार कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी निघालेल्या नेत्यांना अडविण्यात व्यस्त आहे ही बाब क्लेशदायक आहे.
जर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी आलेल्या राहुलजी गांधी यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांची उत्तर प्रदेश सरकार अशी अवहेलना करत असेल तर पीडित दलित कुटुंबाची किती कुचंबणा होत असणार याचा विचार करावा लागेल. केंद्र शासनाने या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी,या घटनाक्रमातील दोषींवर कारवाई करून पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही महापौर गोजमगुंडे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या