कचरा आणि दुर्गंधीपासून नागरिकांची सुटका कचरा संकलनाचे लातुरातील नऊ रॅम्प पालिकेने केले बंद

 

कचरा आणि दुर्गंधीपासून नागरिकांची सुटका 

कचरा संकलनाचे लातुरातील नऊ रॅम्प पालिकेने केले बंद












 लातूर/प्रतिनिधी: शहरातील नागरिकांकडून घरोघरी जाऊन संकलित केलेला कचरा एकत्रित करून तो डेपोवर पाठविण्यासाठी उभारण्यात आलेले शहरातील ९ रॅम्प बंद करण्यात आले आहेत. कचरा आणि दुर्गंधीमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता पालिकेने हा निर्णय घेतला असून आता केवळ दोन रॅम्पवर कचरा एकत्र करण्याचे काम सुरू आहे. लवकरच हे भाग ही कचरा मुक्त होणार आहेत.
मागील ३ वर्षापासून सुरू असलेले रॅम्प बंद केल्यामुळे शहराच्या विविध भागातील नागरिकांना यापुढे कचरा आणि दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागणार नसल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.
   लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या घरोघर जाऊन कचरा संकलन केले जाते. छोट्या वाहनातून हा कचरा जमा केला जातो. अशा छोट्या वाहनातून आणलेला कचरा एकत्र करून तो वरवंटी येथील कचरा डेपोवर पाठविण्यासाठी मोठ्या वाहनात भरला जातो. छोट्या वाहनातील कचरा मोठ्या वाहनात भरण्यासाठी शहरात एकूण ११ ठिकाणी रॅम्प बनवण्यात आले होते. त्यापैकी बजाज शोरूम,रयतू भाजी मंडई, विवेकानंद चौक, टाऊन हॉलच्या पाठीमागील बाजू , स्क्रॅप मार्केट रोड, बालाजी मंदिर मार्ग, शासकीय कॉलनी, गरुड चौक व नंदी स्टॉप येथील रॅम्प बंद करण्यात आले आहेत. आता केवळ दोन रॅम्प कार्यरत आहेत. रिंग रोड परिसरात छत्रपती चौक आणि सिद्धेश्वर मंदिराजवळचा रॅम्प सध्या सुरू असून लवकरच तो ही बंद करण्यात येणार आहे.
    शहरात विविध ठिकाणी असलेल्या रॅम्पवर कचरा एका वाहनातून दुसऱ्या वाहनात भरताना रस्त्यावर पडत होता. त्यामुळे त्या परिसरात अस्वच्छता निर्माण होत होती.नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिका प्रयत्नशील असताना या प्रकारामुळे कचऱ्याचे प्रमाण वाढत होते. त्यासंदर्भात शहरातील काही नागरिकांनी तक्रारीही केल्या होत्या. याची दखल घेऊन महापालिकेने हे रॅम्प बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले. ज्या ठिकाणी रॅम्प होते ती ठिकाणे आता स्वच्छ करण्यात आलेली असून यामुळे यापुढील काळात शहरातील नागरिकांना कचरा आणि दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या