जुने जिल्हाधिकारी परिसराला पश्चिम बाजूने प्रवेशद्वार बनवावे.

 जुने जिल्हाधिकारी परिसराला पश्चिम बाजूने प्रवेशद्वार बनवावे. 

सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांची जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडे मागणी. 




लातुर : दि. २३ - जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शासनाची वेगवेगळे किमान ५० कार्यालये आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, तसेच रजिस्ट्री ऑफिस सारखे जनतेची सतत गर्दी असणारे कार्यालय सुद्धा याच परिसरात आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसह या परिसरातूनच जिल्हा परिषदेला जाण्या येण्या साठीचा सुद्धा मार्ग आहे. नव्याने होत असलेले धर्मादाय आयुक्त  कार्यालयाची इमारत सुद्धा याच परिसरात तयार होत आहे. प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी अशी दोन गेट पूर्वीपासूनच बार्शी रोडवरील कंपाउंडला बसवलेले आहेत. पश्‍चिमेकडील गेटने वाहने आत प्रवेश करतात आणि पूर्वेकडील गेटने वाहने बाहेर पडतात. अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र सर्रासपणे ज्या लोकांना बार्शी रोड वरून पश्चिमेकडे जायचे असते असे बहुतांशी वाहन चालक पूर्वेकडील गेटने बाहेर न जाता पश्चिम गेटनेच चुकीच्या पद्धतीने वाहने बाहेर काढून रॉंग साईडने पश्चिमेकडे जातात. रॉंग साईडने जाणारी वाहने  फक्त सर्वसामान्य नागरिकांचीच असतात असे नाही , तर प्रशासकीय  अधिकाऱ्यांची सुद्धा वाहने कसलीही पर्वा न करता  रॉंग साईडने पश्चिमेकडे जातात. त्यामुळे नेहमीच पश्चिम गेट जवळ वाहनांची गर्दी होते. अनेकदा छोटे मोठे अपघात होतात. आणि वाहनचालकांची भांडणेही होतात. हि वरदळ कमी करण्यासाठी आणि जनतेच्या सोयीसाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पाठीमागील पश्चिमेकडील कंपाउंडला आत येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी असे दोन नवीन गेट तयार करावेत, जेणेकरून नागरिकांची व वाहनचालकांची मोठी सोय होणार आहे. बार्शी रोडवरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी या दोंन गेटचा खूप मोठा फायदा होणार असल्याचे व्यंकटराव पनाळे यांनी  निवेदनात नमूद केले आहे. हे दोन प्रवेशद्वार करण्याची कार्यवाही तातडीने करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी लातूरचे नूतन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बि. पि.यांच्याकडे केली आहे. तसेच याच निवेदनात जिल्हा परिषदेच्या पश्चिमेकडील कंपाउंडला बंद करून ठेवलेले गेट नियमित वापरासाठी सुरू करण्या संदर्भात जिल्हापरिषद प्रशासनालाही सूचना कराव्यात अशी मागणी लोकाधिकार चे प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पनाळे यांनी जिल्हाधिकारी  पृथ्वीराज यांच्याकडे केली आहे.

या निवेदनाच्या प्रती लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख बाभळगावकर, माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सुधाकर शृंगारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्ह्यातील सर्व आमदार, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग लातूर, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांना देण्यात आलेल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या