लवकरच पहिली
बोगी बाहेर पडणार
लातूरच्या मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्यात पहिला कोचशेल तयार
-निजाम शेख यांची माहिती
लातूर /प्रतिनिधी: लातूर येथील मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पात पहिला कोचशेल तयार झाला असून लवकरच पहिली बोगी बाहेर पडेल,अशी माहिती मध्य रेल्वेच्या महाराष्ट्र,मध्यप्रदेश व कर्नाटक झोनल सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख यांनी दिली.
शनिवारी (दि.२६ डिसेंबर)प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर निजाम शेख यांनी सांगितले की, केंद्र सरकारने लातूर जिल्हा आणि मराठवाड्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प दिला आहे.भूमिपूजनाच्या वेळी या प्रकल्पातून डिसेंबर २०२० अखेर उत्पादन सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यानुसार स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी २५ डिसेंबर रोजी पहिला कोचशेल तयार झाला आहे.रेल्वे बोगीचा पूर्ण सांगाडा तयार करण्यात आला आहे.यासाठी अत्यावश्यक यंत्रणा प्रकल्पात कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झालेले आहे.यांत्रिकीकरणाचे जवळपास ९५ टक्के काम पूर्णत्वास आले असून आणखी ५ टक्के काम होणे बाकी आहे. रेल्वे बोगी तयार झालेली असली तरी त्याचे रंगकाम, आसनव्यवस्था, वीज जोडण्या अशा स्वरूपातील काही कामे करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात येत आहे.आगामी काही दिवसात ही पूर्ण यंत्रणा तयार होणार असून लवकरच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे.पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू झाल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे लोकार्पण केले जाणार असल्याचेही निजाम शेख यांनी सांगितले.
मराठवाड्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने हा प्रकल्प मंजूर केला आहे.यासाठी माजीमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर,माजी मंत्री पंकजाताई मुंडे आणि आ.अभिमन्यू पवार यांनी विशेष प्रयत्न केले होते.प्रकल्प कार्यान्वित झाल्यास मराठवाड्यातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून त्यामुळे बेरोजगारी दूर होण्यास मदत होणार असल्याचेही निजाम शेख यांनी सांगितले.
यावेळी रेल्वेबोगी कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.