आर्वीच्या गायरानात लातूरातिल सिग्नल कॅम्प झोपडपट्टी हालवली खरी, मात्र नागरी सुविधा मुळे होत असलेला त्यांचा वनवास कधी थांबवणार ?*

 *आर्वीच्या गायरानात लातूरातिल सिग्नल कॅम्प झोपडपट्टी हालवली खरी, मात्र नागरी सुविधा मुळे होत असलेला त्यांचा वनवास कधी थांबवणार ?*  






सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पनाळे.


लातुर: दि. १५ -  लातूर शहरातील सिग्नल कॅम्प झोपडपट्टी उठवण्यात आली व त्या गोरगरीब लोकांना आर्वीच्या गायरानात तत्कालीन नगरपरिषद प्रशासन व महसूल प्रशासनाने आणून बसवले. मात्र गेली १५ वर्ष आर्वीच्या गायरानात आणुन बसवल्या पासून येथील गोरगरीब जनता नागरी सुविधांपासून वंचित आहे. त्यांचा वनवास महानगरपालिकेने थांबवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी प्रशासनाकडे केली आहे. या वस्तीला लगतच सर्वधर्मीय स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीचे कंपाउंड वॉल पडून गेल्यामुळे त्याचाही त्रास आर्वी गायरान वस्तीत राहणाऱ्या लोकांना सहन करावा लागत आहे. येथे राहणाऱ्या लोकांच्या करिता वस्तीत येण्यासाठी रस्ता सुद्धा चांगला नाही. पूर्वीच्या झालेल्या अर्धवट बांधकामामुळे शौचालयासाठी येथील नागरिकांना उघड्यावर जावे लागते. लोकांना घरातील कचरा टाकण्यासाठी जागा नसल्यामुळे घरातला कचरा लोक रस्त्याच्या कडेला वाटेल तेथे फेकून देतात. त्यामुळे घाणीचे साम्राज्य येथे पसरले आहे. या वस्तीत वीज पुरवठा करणाऱा डीपी वस्ती लगत असलेल्या शेतकऱ्याच्या शेतात आहे. अनेक महिन्यापासून हा डीपी बंद असल्यामुळे वस्तीत घरोघरी पुरवठा केलेला वीजपुरवठा मागील तीन महिन्यांपासून बंदच आहे. त्यामुळे  आर्वी गायरान वसाहतीतील लोकांच्या घरात अंधार निर्माण झाला आहे. डीपी बंद असल्यामुळे आर्वी गायरान वसाहतीत राहणाऱ्या लोकांनी अर्धा अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत वायर टाकून अनेकांनी वीज पुरवठा सुरू करून घेतला आहे. लोकांनी आकडे टाकून दुरून वायर टाकून आणलेल्या वीज पुरवठ्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे होणाऱ्या जीवितहानीस कोण जबाबदार ? अशा अनेक समस्यांचा पाढा आणि अडचणी आर्वी गायरान वसाहतीत राहणाऱ्या लोकांनी लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व लोकाधिकार चे प्रमुख व्यंकटराव पनाळे यांच्यासमोर मांडल्या. महानगरपालिकेने येथील नागरिकांच्या अडचणी कडे लक्ष देऊन त्यांची होणारी गैरसोय तात्काळ दूर करावी अशी मागणी व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे. सिग्नल कॅम्प येथील झोपडपट्टी स्थलांतरित करत असताना येथील गोरगरीब जनतेला दिलेले आश्वासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी पार विसरून गेले आहेत. आता फक्त कोणतीही निवडणूक आली की मतदान मागायला येणारे लोक तेवढ्यापुरते गोड बोलून मतदान करून घेतात मात्र आमच्या अडचणीकडे कोणीही लक्ष देत नाही. अशी खंत या भागातील रहिवाशांनी लोकाधिकारचे प्रमुख व्यंकटराव पनाळे यांच्याशी बोलताना व्यक्त केली आहे. 

महानगरपालिकेने या वस्तीतील कचरा उचलण्यासाठी दररोज घंटागाडी पाठवण्याची आवश्यकता असल्याचे पनाळे यांनी म्हटले आहे.  

वस्तीतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गोरगरीब लोकांनी लोक वाटा गोळा करून अंदाजे वीस हजार रुपये महानगरपालिके मध्ये भरले आहेत मात्र याची पावती संबंधित पैसे भरून घेणाऱ्या अधिकारी महिलेने दिलीच नाही. पावती न देण्यामागचे कारण काय ?  मग हे पैसे गेले कुठे ? ती महिला अधिकारी कोण ? आयुक्त आणि महापौर पैसे घेऊन पावती न देणाऱ्या प्रकरणाचा छडा लावून संबंधित अधिकारी महिलेवर काय कार्यवाही करणार ? असा प्रश्न  सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी केला आहे. एकूणच आर्वी गायरानात राहिलेल्या जनतेची होत असलेली कुचंबना महानगरपालिकेने थांबवुन त्यांना नागरी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी व्यंकटराव पनाळे यांनी महानगरपालिकेचे  आयुक्त देविदास टेकाळे आणि महापौर  विक्रांत गोजमगुंडे यांच्याकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या