गंजगोलाईतील आगीची चौकशी करण्याचे महापौरांचे आदेश शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश अग्निशमन दलाच्या जवानांची अभिमानास्पद कामगिरी महापौर-आयुक्तांनी घटनास्थळावरून हलवली यंत्रणा

 




गंजगोलाईतील आगीची  चौकशी करण्याचे महापौरांचे आदेश

 शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश 

अग्निशमन दलाच्या जवानांची  अभिमानास्पद कामगिरी 

महापौर-आयुक्तांनी घटनास्थळावरून हलवली यंत्रणा







लातूर/प्रतिनिधी:शुक्रवारी सायंकाळी गंजगोलाईतील गोयल ट्रेडर्सच्या इमारतीला लागलेली आग अग्निशमन दल व पोलिसांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आली.या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.तरीदेखील अशा घटना पुन्हा घडू नयेत याचे निर्देश देतानाच ही आग नेमकी कशामुळे लागली? याची सर्वंकष तपासणी करण्याचे आदेश महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी पालिका आयुक्तांना दिले आहेत. महापौरांसह आयुक्तांनी घटनास्थळावर उपस्थित राहत पालिकेची यंत्रणा कामाला लावली त्यामुळेच लवकरात लवकर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
    शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास गंजगोलाईतील गोयल ट्रेडर्स या इमारतीस भीषण आग लागली.पाहता पाहता संपूर्ण चार मजली इमारत आणि परिसरातील इमारतींनाही या आगीने आपल्या कवेत घेतले. आग लागल्याचे समजताच गंजगोलाईतील व्यापारी व नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.बघ्यांचीही मोठी गर्दी जमली.
   महापौर विक्रांत गोजमगुंडे यांना या प्रकाराची माहिती मिळताच ते स्वतः घटनास्थळी दाखल झाले.पालिका आयुक्त अमन मित्तल तसेच अग्निशमन दल,स्वच्छता विभाग आणि पालिकेतील प्रत्येक विभागाला तातडीने घटनास्थळी हजर होण्याचे आदेश त्यांनी दिले.
पोलिसांनाही माहिती दिली.
   आगीची तीव्रता वाढत असतानाच महापालिकेचे अग्निशमन बंब तेथे दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले पण तरीही आग आटोक्यात येत नव्हती.हे पाहून घटनास्थळी असणारे महापौर गोजमगुंडे यांनी प्रशासनाशी संपर्क साधत उदगीर,औसा तसेच इतर ठिकाणचे बंब उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले.हे बंबही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
   सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात
आणण्यात यश आले.आगीची तीव्रता प्रचंड असतानाही स्वतःचा जीव धोक्यात घालत अग्निशमन दलाच्या जवानांनी आग अधिक पसरू नये याची काळजी घेत आगीवर नियंत्रण मिळविले.
  ज्या ठिकाणी आग लागली होती ती इमारत अतिशय अरुंद रस्त्यावर होती.त्यामुळे अग्निशमन दलाच्या वाहनांना थेट इमारती पर्यंत पोहोचताही येत नव्हते.तरीदेखील जवानांनी हार मानली नाही.यामुळेच या दुर्घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही.आर्थिक नुकसान मात्र झाले असून त्याचा अंदाजही सध्या बांधता येत नाही.
    चौकट१
पालकमंत्र्यांकडून निर्देश ...
दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख हे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या संपर्कात होते. आग लागल्याचे समजताच त्यांनी महापौरांकडून संपूर्ण घटनाक्रमाची माहिती घेतली.आग विझवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.

चौकट २ ....
महापौर-आयुक्त ऑन दी स्पॉट ...
   आग लागल्याचे समजताच महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि पालिका आयुक्त अमन मित्तल घटनास्थळी दाखल झाले.तेथे उपस्थित राहून त्यांनी आग आटोक्यात आणण्याच्या कामी यंत्रणा गतिमान केली. महापालिकेच्या प्रत्येक विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याला आदेशित करून आगीवर लवकरात लवकर नियंत्रण कसे मिळवता येईल यासाठी प्रयत्न केले.महापौर आणि आयुक्त दोघेही ऑन दी स्पॉट हजर असल्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण मिळवता आले.

 चौकट...३  
  अग्निशमन दल व पोलिसांची कामगिरी अभिमानास्पद - महापौर

लातूर शहराच्या हृदयस्थानी असणाऱ्या गंजगोलाई सारख्या गजबजलेल्या भागात सायंकाळी लागलेली आग हे मोठे आव्हान होते.सायंकाळच्या वेळी या परिसरात हजारो व्यापारी आणि खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी असते.आग अधिक पसरली असती तर संपूर्ण बाजारपेठेला धोका होता.हे लक्षात घेत अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस विभागाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले. अग्निशमन दल व पोलीस दलाची कामगिरी अभिमानास्पद आहे. त्यांच्या शौर्यामुळेच ही आग आटोक्यात येऊ शकली.
जीवितहानी रोखता आली,असेही महापौर गोजमगुंडे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या