गावाच्या पाण्यासाठी सरपंचाना अडकवले
नरेगातील सार्वजनिक विहिरीच्या कामाची देयके
वर्षभरापासून थकली
औसा :
प्रतिनिधी
आफताब शेख /मुख़्तार मणियार
उन्हाळ्यात टंचाईच्या काळात गावात पाण्याची
ओरड होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सरपंचांना गावासाठी सार्वजनिक विहिरीचे खोदकाम व बांधकाम करण्यास सांगण्यात आले.सरपंचानी पदरमोड ,उधार उसनवारी करत बांधकामे करून गावाला पाणी दिले.पण वर्ष होत आले तरी अजून या कामाची बिले मिळत नसल्याने आज सरपंचांना गावात तोंड लपवून फिरण्याची वेळ आली आहे.ही बिले तात्काळ देण्याची मागणी औसा तालुका सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
मागील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात पाणीटंचाई लक्षात घेता सरपंचांनी गावासाठी सार्वजनिक विहिरींचे खोदकाम व बांधकाम करून घेण्याचे आदेश जिल्हा परिषदेकडून देण्यात आले. या कामासाठी प्रारंभी १६ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले.नंतर त्यात कपात करत ते ७ लाखावर आणले गेले.यात खोदकामासाठी साडेतीन लाख व बांधकामासाठी साडेतीन लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. खोदकामासाठी असणाऱ्या तरतूद नुसार मजुरांना पैसे मिळाले.बांधकामासाठी सरपंचाना कसलीही आगाऊ रक्कम दिली गेली नाही. गावच्या पाण्यासाठी सरपंचांनी तातडीने बांधकामे केली.ग्रामपंचायतींकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध नसतो. त्यामुळे अनेक गावात सरपंचांनी उधार उसनवारी केली.अनेकांनी व्याजाने पैसे काढत बांधकामे पूर्ण केली. शासनाकडून पैसे आल्यानंतर देणी देऊ असा विचार करत ही कामे पूर्ण करण्यात आली.पण वर्ष होत आले तरी अजून शासनाकडून पैसे मिळत नाहीत.त्यामुळे सरपंचांना गावात देणेकऱ्यांना चुकवून फिरावे लागत आहे.
शासनाने ग्रामपंचायतींना विहीर बांधकामाचे राहिलेले पैसे तात्काळ द्यावेत,अशी मागणी औसा तालुका सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.तालुक्यातील अनेक गावात सरपंच प्रकाराने त्रस्त झाले आहेत. शासनाने यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करावी.विहीर बांधकामासाठी मंजूर असणारे पैसे अदा करावेत,
अशी मागणी करणारे निवेदन आज गुरुवारी ( दि.१८ फेब्रूवारी)औसा तालुका सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.शासनाने पैसे लवकरात लवकर द्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. पालकमंत्री अमित देशमुख , पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे,माजी मंत्री दिलीपराव देशमुख,आ. अभिमन्यू पवार यांनाही या निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर कवळीचे सरपंच तथा सरपंच संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मोरे,राजीव कसबे, ज्ञानेश्वर कांबळे, गोपीचंद पवार,संपत गायकवाड ,शिवशंकर कोल्हे ,गुलाब कावळे,धनराज गुट्टे,महादेव वाघमारे , पद्माकर तौर ,सुधाकर खडके,अमोल पाटील आदींसह विविध गावच्या सरपंच आणि उपसरपंचांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.