नवीन रेणापूर नाका ते गरुड चौक वळण रस्त्यासाठी ३ कोटी १७ लाखाचा निधी.

 

नवीन रेणापूर नाका ते गरुड चौक वळण रस्त्यासाठी ३ कोटी १७ लाखाचा निधी.

 रस्त्याचे काम दर्जेदार टिकाऊ करण्याचे पालकमंत्री ना अमित विलासराव देशमुख  यांचे निर्देश





लातूर प्रतिनिधी : १८ फेब्रुवारी २१ :
 लातूर शहर आणि जवळपासच्या गावच्या वाहतुकीसाठी महत्वाच्या असलेल्या नवीन रेणापूर नाका ते गरुड चौक या वळण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन वार्षिक आराखड्यातून ३ कोटी १७ लाख ७८ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, यातून सदरील रस्त्याचे काम दर्जेदार आणि टिकाऊ करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.
     लातूर शहरालगतच्या नवीन रेणापूर नाका ते गरुड चौक या वळण रस्त्याने लातूर–नांदेड आणि लातूर - औरंगाबाद हे दोन महामार्ग जोडले जातात. या रस्त्यावर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील अनेक गावांचीही वाहतूक होते .या मार्गावरच श्री सिद्धेश्वर मंदिर , डीमार्ट व इतर व्यापारी प्रतिष्ठाने आहेत . मागच्या काही दिवसात या रस्त्याची दुरावस्था झालेली होती. रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण देखील वाढले होते . या संदर्भाने नागरिकांनी पालकमंत्री ना. अमित देशमुख यांना निवेदन देऊन रस्ता दुरुस्त व्हावा अशी मागणी केली होती . जनतेच्या मागणीचा विचार करून लातूर शहर महानगरपालिकेने महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजने अंतर्गत सदरील रस्ता दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून लातूर जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यातून निधीची मागणी केली होती .
       लातूर शहर महापालिकेच्या विनंतीनुसार जिल्हा नियोजन वार्षिक आराखड्यातून सदरील रस्त्याचे काम करून घेण्यासाठी ३ कोटी १७ लाख ७८ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून तसे पत्र जिल्हाधिकारी ,पृथ्वीराज बी.पी. यांनी महापालिकेला पाठविले आहे.
 नवीन रेणापूर नाका ते गरुड चौक या वळण रस्त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला आहे. सदरील काम दर्जेदार होण्यासाठी महापौर विक्रांत गोजमगुंडे त्यांचे सहकारी तसेच मनपा आयुक्त अमन मित्तल कार्यकारी अभियंता थोरात यांनी विशेष लक्ष द्यावे असे निर्देश पालकमंत्री  ना. देशमुख यांनी दिले आहेत.
------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या