नुतन इमारत उभारणीसाठी पाठपुरावा करणार-आ. संभाजी पाटील निलंगेकर

 





 नुतन इमारत उभारणीसाठी पाठपुरावा करणार-आ. संभाजी पाटील निलंगेकर


लातूर जिल्हा वकील मंडळाच्या आयटी ग्रंथालयाचे उद्घाटन
लातूर/प्रतिनिधीः-  न्याय व्यवस्था ही लोकशाहीचा स्तंभ म्हणून ओळखली जाते. लातूर शहरात  विविध 46 न्यायालयाच्या वेगवेगळ्या ठिकाणी इमारती कार्यरत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी या इमारती असल्याने कामानिमित्त येणार्‍या नागरीकांची आणि वकील बांधवाची मोठी गैरसोय होत आहे. ही वेगवेगळ्या ठिकाणी असलेली न्यायालय एकाच छताखाली आणण्यासाठी जिल्हा न्यायालयाच्या समोर असलेल्या जुन्या विश्रामगृहाच्या जागेत न्यायभवन उभारण्यास मंजूरी मिळालेली असून या ठिकाणी न्यायालयाची नुतन व भव्य इमारत व्हावी याकरीता आपण पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.
लातूर येथील जिल्हा न्यायालयात जिल्हा वकील मंडळाच्या वतीने नवीन आयटी ग्रंथालय व जुन्या ग्रंथालयाचे नुतनीकरण करण्यासाठी पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्हा वकील मंडळाच्या मागणीनुसार डी.पी.डी.सी.च्या माध्यमातून 15 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन दिला होता. या निधीतून उभारण्यात आलेल्या नवीन आयटी ग्रंथालयाचे व नुतनीकरण केलेल्या ग्रंथालयाचा उद्घाटन सोहळा माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी आ. निलंगेकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. चंद्रकांत आगरकर तर प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे सदस्य अ‍ॅड. अण्णाराव पाटील, जिल्हा वकील मंडळाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. सचिन पंचाक्षरी, सचिव तथा शहर काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, कोषाध्यक्ष अ‍ॅड. गणेश गोजमगुंडे, महिला उपाध्यक्षा प्रतिभा कुलकर्णी, ग्रंथालय सचिव अ‍ॅड. दत्तात्रय पांचाळ, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. दिपक मठपती, अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. ज्ञानेश्वर चेवले, अ‍ॅड. संभाजीराव पाटील, अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्यासह जिल्हा वकील मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व विधिज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनतेच्या आर्शिवादाने मिळालेले पद ही काम करण्यासाठी एक मोठी संधी असते असे सांगून या पदाच्या माध्यमातून जनहिताची कामे अधिकाधिक प्रामाणिकपणे प्रयत्न करून पालकमंत्री असताना आपण केली असल्याचे आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले. पद असो किंवा नसो प्रामाणिपणे जनहिताची कामे करणे आवश्यक असते. त्याचे निश्चितच फळ मिळते असे सांगून आज आपल्याकडे पद नसतानाही जिल्हा वकील मंडळाने आपल्याला उद्घाटक म्हणून निमंत्रीत केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त केले. प्रामाणिक व लोकहिताचे काम केल्यास जनतेशी ऋृणानुबंध अधिक घट्ट होतात ही शिकवण आक्कांनी आम्हाला दिलेली असून त्यानुसारच आमची राजकारणात वाटचाल चालू असल्याचे आ. निलंगेकर यांनी यावेळी सांगितले.
लोकशाहीचा स्तंभ म्हणून न्याय व्यवस्थेची ओळख आहे. आजही न्याय व्यवस्थेवर सर्वसामान्यांचा मोठा विश्वास असून न्याय मिळण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या न्यायालयामध्ये कामानिमित्त येत असल्याचे आ. निलंगेकर यांनी स्पष्ट केले. लातूर हे जिल्ह्याचे ठिकाणी असून या ठिकाणी वेगवेगळी 46 न्यायालय कार्यरत आहेत. या 46 न्यायालयांना एकाच छताखाली आणावे अशी मागणी जिल्ह्यातील वकीलांच्या माध्यमातून आपण तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती याची आठवण देत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जुन्या विश्रामगृहाच्या परिसरात न्यायालयाची नवीन इमारत बांधावी असे सांगण्यात आलेले आहे. या नवीन इमारतीसाठी आवश्यक असलेला निधी व ही इमारत लवकरात लवकर उभारली जावी या करीता आपण शासन दरबारी पाठपुरावा करू अशी ग्वाही आ. निलंगेकर यांनी यावेळी उपस्थितांना दिली. नव्याने वकीली सुरु करणार्‍या वकीलांना शासनाच्या वतीने प्रतिमहा आर्थिक मदत मिळावी अशी मागणी अ‍ॅड. अण्णाराव पाटील यांनी केलेली असून ही मागणी अतिशय रास्त असल्याचे आ. निलंगेकर यांनी स्पष्ट केले. या मागणीसाठी आपण आगामी अधिवेशनात प्रश्न मांडून याकरीता लोकप्रतिनिधीच्या स्वाक्षर्‍या घेऊन शासनाकडे पाठपुरावा करू असे आ. निलंगेकर यांनी यावेळी आश्वासीत केले.
याप्रसंगी अ‍ॅड. अण्णाराव पाटील, अ‍ॅड. किरण जाधव व अ‍ॅड. चंद्रकांत आगरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या नंतर जिल्हा वकील मंडळाला सर्वाधिक निधी माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिल्याबद्दल त्यांचा जिल्हा वकील मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा वकील मंडळाच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते पारितोषीक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अ‍ॅड. इरफान शेख तर आभार प्रदर्शन अ‍ॅड. सचिन पंचाक्षरी यांनी केले.

चौकट
तर अधिक उर्जा मिळेल
विद्यमान पालकमंत्री अमित देशमुख यांनी निलंगेकरांच्या बोलण्यातून आम्हाला काम करण्याची उर्जा मिळते असे एका कार्यक्रमानिमित्त बोलले होते. केवळ बोलण्यातून उर्जा मिळत असेल तर न्यायालयाच्या नुतन इमारत उभारणीसाठी वकील मंडळाच्या शिष्टमंडळासोबत प्रत्यक्ष पालकमंत्र्याची भेट घेऊ  असे आ. निलंगेकर यांनी सांगून बोलण्यातून उर्जा मिळत असेल तर भेटल्यावर अधिकच उर्जा मिळेल असे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या