फुले-शाहू आंबेडकरांचा वारसा जपण्यासाठी शिक्षण गरजेचे- बापूसाहेब भुजबळ...
औसा प्रतिनिधी /-महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील सर्वसामान्य माणसाला शिक्षणाची दारे खुली करून दिली. शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती शक्य नाही म्हणून शिक्षण अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापुसाहेब भुजबळ यांनी केले. दि. 4 फेब्रुवारी रोजी माळी गल्ली येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. पुढे बोलताना बापूसाहेब भुजबळ म्हणाले कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजनाला शिक्षण मिळावे म्हणून शिक्षण संस्था उभारल्या. इतर मागासवर्गीय समाजाला मंडल आयोग लागू करण्यासाठी ना. छगनराव भुजबळ यांनी आग्रह धरला. ओबीसी समाज सर्व क्षेत्रात मागासलेला असून अंधश्रद्धेला झुगारून देऊन शिक्षणाची कास धरली पाहिजे. शिक्षणा शिवाय तरणोपाय नाही. आजही प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा असून स्पर्धेच्या युगात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत सर्व समाजाच्या प्रगतीसाठी आपले आयुष्य वेचले आहे. ओबीसी समाजातील युवकांनी राष्ट्रपुरुषांचे विचार समाजात रुजवणे आवश्यक आहे. जातीची खोटी प्रमाणपत्रे घेऊन काही लोक राजकीय क्षेत्रात घुसून ओबीसीच्या हक्कात अडथळा निर्माण करीत असून ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी समाजाने शिक्षण घेऊन संघटित होणे काळाची गरज आहे. असेही शेवटी भुजबळ यांनी स्पष्ट केले. यावेळी सर्वश्री राजाराम माळी, त्र्यबक म्हेत्रे, नागोराव वडगावे, माजी उपनगराध्यक्ष दिगंबर माळी, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बालाजी फुले, श्री रविंद्र सोनवणे, विजय टाकेकर, बालाजी बादाडे, संजय माळी, जिल्हा उपाध्यक्ष नारायण माळी, शहराध्यक्ष भागवत म्हेत्रे, सामाजिक कार्यकर्ते राम कांबळे, सचिन माळी, महादेव माळी, सोपान कठारे, मुन्ना फुटाणे, रमाकांत माळी, विकास माळी, क्षीरसागर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते. प्रारंभी बापुसाहेब भुजबळ यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन बी एम माळी यांनी केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.