मयत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा धनादेश
राजीव गांधी अपघात विमा योजनेतून मिळाले ७५ हजार
समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे यांचा पुढाकार
लातूर/प्रतिनिधी:अपघातात मरण पावलेल्या तीन शाळकरी विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना जिल्हा परिषदेच्या राजीव गांधी अपघात विमा योजनेतून प्रत्येकी ७५ हजार रुपये आर्थिक मदत करण्यात आली.जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे यांच्या पुढाकारातून हा निधी मंजूर करण्यात आला.वाघमारे यांच्या हस्ते संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना धनादेश सुपूर्द करण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, वर्षभरापूर्वी चाकूर तालुक्यातील अजनसोंडा, हिंपळनेर व नांदगाव येथील तीन विद्यार्थ्यांचे एका अपघातात निधन झाले होते. विद्यार्थ्यांचे अपघाती निधन झाल्यास त्यांना मदत देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने राजीव गांधी अपघात विमा योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून तीनही विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी यासाठी चाकुर तालुक्याचे सूपूत्र तथा जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे यांनी पुढाकार घेतला.पाठपुरावा करून विमा योजनेतून निधी मंजूर करून घेतला.
जिल्हा परिषदेत एका छोटेखानी कार्यक्रमात सभापती रोहिदास वाघमारे यांच्या हस्ते मयत विद्यार्थ्यांचे नातेवाईक,अजनसोंडा येथील संदीप बंडू तेलंगे, हिंपळनेर येथील हैदर शेख व नांदगाव येथील प्रतीक्षा कांबळे यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती गोविंद चिलकुरे,शिक्षणाधिकारी भगवान फुले,भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव बेनगिरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अशोक चिंते, महेश कांबळे, सिद्धेश्वर पवार,सुरज शिंदे,येळापुरे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.