मालोजी राजे गढीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देणार - सांस्कृतीक कार्य मंत्री अमित देशमुख मालोजी राजे भोसले गढी दुरूस्ती व संवर्धनाबाबत आढावा बैठक





 


 

 औरंगाबाद, दिनांक 16 (जिमाका):

   जगप्रसिद्ध वेरूळ या ठिकाणी ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मालोजी राजे भोसले गढीच्या दुरूस्ती व संवर्धनासाठी शासनाकडून तातडीने निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज दिली.

     वेरूळ येथील हॉटेल कैलास येथे मालोजी राजे भोसले गढी दुरूस्ती व संवर्धनाबाबत आढावा बैठक मंत्री श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मीना शेळके, कल्याण काळे, शहाजी स्मारक समितीचे किशोर चव्हाण, डॉ. त्र्यंबक पाटील, किरण पाटील डोणगावकर, पुरातत्व व वस्तूसंग्रहालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, कामाजी डक, निलिमा मार्केंडय, प्रकाश रोकडे, बालाजी बनसोडे, वास्तूविशारद प्रदीप देशपांडे आदींसह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.    

     मंत्री श्री. देशमुख म्हणाले, मालोजी राजे गढीची बारकाईने पाहणी केली. येथील अवशेषांचे जतन करण्याबाबत निर्देश दिले आहेत. या गढीला अधिक चांगल्या पद्धतीने विकसित करण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करायला हवेत. पुरातत्त्वीय संकेतानुसार संशोधन करून गढी संदर्भातील माहिती, छायाचित्रे गोळा करावीत. गढी परिसरातील अवशेषांची माहिती देणारे फलक अवशेषा नजिक लावावेत. गढीचे स्वरूप कसे होते, याबाबत माहिती देणारे ऑडियो, व्हिडिओ गाईडच्या माध्यमातून तसेच प्रतिकृती स्वरूपात प्रदर्शित करण्याबाबत विचार करण्यात यावा. स्थानिक कलावंतांना वाव मिळावा या हेतूने सांस्कृतिक विभागाने पुरातत्त्व विभागाशी समन्वय साधून वारसा स्थळांवर कार्यक्रम सादर करण्याबाबत नियोजन करावे आणि कलावंतांच्या कलेला व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना केल्या.

     यावेळी समितीचे श्री.चव्हाण यांनी शहाजी महाराज जयंती राज्यस्तरावर साजरी करण्यात यावी, वेरूळ गावालगत असलेल्या सिकमी (डमडम) तलावास राज्य संरक्षित स्मारक घोषित करावे, कर्नाटकातील शहाजी महाराजांच्या समाधी स्थळी शहाजीराजांचा पुतळा उभारण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, डॉ.पाटील यांनी शहाजी राजे अध्यासन केंद्र सुरू करावे, डॉ. काळे यांनी इतर राज्याच्या धर्तीवरच स्थानिक कलावंतांना कला सादर करण्यासाठी प्रोत्साहित करावे आदी मागण्या केल्या. मंत्री श्री. देशमुख यांनी या मागण्यांची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत योग्य ते निर्देशही तत्काळ दिले.

     बैठकीपूर्वी श्री. देशमुख यांनी वेरूळ गावातील मालोजी राजे भोसले गढी आणि शहाजी राजे भोसले स्मारकाची पाहणी केली.

**

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या