सेवेत आढळल्या त्रुटी...
ग्राहकाला गाडी बदलुन देण्याचे होंडा कार्सला आदेश
कंपन्यांच्या मनमानीला ग्राहक मंचाचा दणका
लातूर/प्रतिनिधी: होंडा कार्स या कंपनीच्या गाडीमध्ये त्रुटी आढळल्यामुळे ग्राहकाला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला.त्या ग्राहकाला जुनी गाडी परत घेत नवी गाडी देण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे.
या प्रकरणाची माहिती अशी,लातूर येथील नामांकित वकील संजय पांडे यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये होंडा जाझ ही कार खरेदी केली होती.गाडीसोबत कंपनीने दिलेल्या माहिती पुस्तिकेत ही गाडी प्रतिलिटर १९ किलोमीटर धावते असे सांगण्यात आले होते. ॲड.संजय पांडे यांना ही कार वापरत असताना प्रत्यक्षात वेगळा अनुभव आला.प्रति लिटर केवळ ७ ते ८ किलोमीटर गाडी धावायची.
लातूर येथील कायझन होंडा या डीलर कडून त्यांनी गाडी खरेदी केली होती.गाडी घेतल्यानंतर अनेक वेळा सर्विसिंग करण्यात आली.
त्यानंतरही गाडीच्या ॲव्हरेज मध्ये वाढ झाली नाही. याबाबत ॲड.संजय पांडे यांनी तक्रारी केल्या.स्थानिक डीलर दाद देत नसल्याने कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही ई-मेलद्वारे त्यांनी या संदर्भात कळवले. परंतु कंपनीकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही.
या संदर्भात ॲड.संजय पांडे यांनी जिल्हा ग्राहक मंचात तक्रार दाखल केली.निर्मिती सदोष असल्याचे तसेच कंपनीने वाहनाची विक्री करताना 'अनुचित व्यापारी प्रथा' अवलंबली असल्याचेही त्यांनी दाव्यात म्हटले होते.
जिल्हा ग्राहक मंचाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाल्यानंतर ग्राहक मंचाने नुकताच अंतिम निकाल दिला.होंडा कार्सने ॲड.पांडे यांना दिलेली सदोष गाडी परत घेऊन एक महिन्याचा आत त्यांना नवी गाडी द्यावी.मानसिक त्रासापोटी ५ हजार रुपये व खर्चापोटी ३ हजार रुपये द्यावेत,असेही ग्राहक मंचाने आपल्या निकालात म्हटले आहे.
ग्राहक मंचाच्या या निकालामुळे खोट्या माहितीच्या आधारावर वाहनांची विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या मनमानीला चाप बसणार आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.