लातूर जिल्ह्यात व्यापक स्वरूपात सैन्यभरती मेळावे घ्यावेत
- खा.शृंगारे व आ. निलंगेकर यांची संरक्षण मंत्र्यांकडे मागणी
लातूर/प्रतिनिधी: लातूर जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांना राष्ट्रीय सुरक्षेच्या माध्यमातून नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात,सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी तिन्ही सैन्यदलांचे भरती मेळावे व्यापक स्वरूपात घेण्यात यावेत,अशी मागणी खा. सुधाकरराव शृंगारे व आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
संरक्षणमंत्र्यांची भेट घेवून त्यांना दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की,लातूर हा जिल्हा कायम दुष्काळाच्या सावटाखाली असतो.त्यामुळे शेतीच्या माध्यमातून फारसे उत्पन्न मिळत नाही.या जिल्ह्यात मोठ्या उद्योगधंद्यांची कमतरता आहे.त्यामुळे बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळत नाही.अशा स्थितीत सैन्यदलातील नोकरी ही तरुणांना मोठा आधार ठरू शकते.
मागच्या दशकभरापासून जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे.त्यामुळे सिंचनाला पाणी मिळत नाही.पाण्याची कमतरता असल्यामुळे येथे सुरू असणारे छोटे-मोठे उद्योग इतर जिल्ह्यात स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे.मागच्या वर्षभरापासून कोरोना संकटाने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.मोठ्या शहरात रोजगार करणाऱ्या अनेकांना कामे बंद झाल्यामुळे गावात परतावे लागले आहे.या सर्व कामगार आणि तरुणांना सामावून घेऊ शकतील असे उद्योगधंदे जिल्ह्यात नाहीत.सैन्यात भरती होण्यासाठी जिल्ह्यातील तरुण उत्सुक आहेत.अशा तरुणांना संधी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी तीनही सैन्यदलांचे भरती मेळावे व्यापक स्वरूपात लातूर जिल्ह्यात आयोजित करावेत.यातून हजारो तरुणांना आपले राष्ट्रसेवेचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.संरक्षणमंत्र्यांनी या मागणीचा गांभीर्याने विचार करावा,अशी मागणीही खा.शृंगारे व आ.निलंगेकर यांनी या निवेदनात केली आहे.
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717
Mobile No. 9422071717
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.