जिल्ह्यातील उर्वरित आस्थापना उघडण्यासाठी
नियम व अटीच्या अधीन राहून परवानगी
--- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आदेश
हिंगोली, (शेख इमामोद्दीन ) दि. 11 : राज्यात तसेच जिल्ह्यात कोविड-19 बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात 7 दिवस संचारबंदी लागू केली होती.
या संचारबंदीनंतर जिल्ह्यातील काही आस्थापना, दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली होती. जिल्ह्यातील उर्वरित व्यापार, दुकाने उघडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी कोरोनाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे नियम व अटीच्या अधीन राहून परवानगी दिली आहे.
प्रतिबंधमुक्त :
1. जिल्ह्यातील ज्या आस्थापना चालक, दुकानदार, व्यापारी व त्यांच्याकडे काम करणारे कर्मचाऱ्यांकडे दि. 01 मार्च, 2021 ते दि. 10 मार्च, 2021 या कालावधीतील कोरोना अँटीजेन चाचणी अहवाल निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र आहे अशांना दि. 11 मार्च, 2021 पासून त्यांची आस्थापना, दुकाने, व्यापार उघडण्यास परवानगी असेल. परंतु अशा व्यापाऱ्यांना व त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांची आरटीपीसीआर चाचणी दि. 20 मार्च, 2021 पर्यंत करणे बंधनकारक असेल. व्यापाऱ्यांनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी दि. 14 मार्च, 2021 ते दि. 20 मार्च, 2021 या कालावधीत त्यांची आरटीपीसीआर चाचणी अनिवार्यपणे करुन घेणे बंधनकारक असेल.
2. जिल्ह्यातील ज्या व्यापारी, आस्थापना चालक, दुकानदार व त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दि. 01 मार्च, 2021 ते दि. 10 मार्च, 2021 या कालावधीत कोरोना अँटीजेन चाचणी करुन घेतली नाही अशांना त्यांची दुकाने, व्यापार उघडण्यास परवानगी नसेल. परंतु अशानी आता केवळ कोरोना आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावी. आरपीसीआर चाचणीनंतर ज्या व्यापारी, आस्थापना चालक, दुकानदार त्यांच्या कर्मचाऱ्यांचा कोरोना आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे केवळ अशांना त्यांचा व्यापार, आस्थापना, दुकाने उघडण्यास परवानगी असेल. करिता अशा व्यापारी, दुकानदार यांनी या आदेशानुसार देण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार आरटीपीसीआर चाचणी करुन घेणे बंधनकारक असेल.
3. जिल्ह्यातील सर्व व्यापारी, आस्थापना चालक, दुकानदार व त्यांच्याकडे काम करणारे कर्मचारी यांना दर 15 दिवसाला त्यांची कोरोना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असेल.
4. जिल्हा आरोग्य विभागाने तसेच संबंधित विभागांनी दि. 11 मार्च, 2021 रोजीपासून या आदेशानुसार देण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील व्यापारी, दुकानदार, त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी कॅम्प उभारावेत. आरटीपीसीआर अहवाल देतेवेळी 15 दिवसाची मर्यादा देण्यात यावी. याकरिता कोरोना आरटीपीसीआर चाचणी अहवालावर 15 दिवसाच्या मर्यादेचा उल्लेख करण्यात यावा व याची नोंद करुन घ्यावी.
5. त्यानुसार नियम व अटीमध्ये येणारे जिल्ह्यातील किराणा, कृषी उत्पन्न बाजार समिती, कृषी सेवा दुकाने यांना सकाळी 10.00 ते सायंकाळी 7.00 या कालावधीत त्यांचे व्यापार, दुकाने उघडण्यास परवानगी असेल.
6. वरील नियम व अटी मध्ये येणाऱ्या जिल्ह्यातील भाजीपाला दुकाने, फळ विक्री दुकाने, मांस, मच्छी, मटन विक्री दुकाने, दारु व बियर विक्री दुकाने सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 या कालावधीत उघडण्यास परवानगी असेल.
7. वरील नियम व अटीमध्ये येणारे दूध डेअरी सकाळी 7.00 ते सकाळी 10.00 व सायंकाळी 7.00 ते रात्री 9.00 या कालावधीत उघडण्यास परवानगी असेल.
8. वरील नियम व अटी मध्ये येणारे जिल्ह्यातील सर्व मेडिकल दुकाने सकाळी 9.00 ते रात्री 9.00 या कालावधीत तसेच आवश्यकतेनुसार उघडण्यास परवानगी असेल.
9. वरील नियम व अटीमध्ये येणारे जिल्ह्यातील इतर उर्वरित व्यापार, दुकाने सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 या कालावधीत उघडण्यास परवानगी असेल.
10. जिल्ह्यातील बँका नागरिकांसाठी सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीत चालू राहतील.
11. एमएसआरटीसी बसेस पूर्ण क्षमतेने वाहतूक करण्यास परवानगी असेल. परंतु या बसेस केवळ शासकीय बस स्थानकाव्यतिरिक्त इतर कोठेही थांबणार नाहीत.
12. ऑटोरिक्षा वाहतुकीस केवळ 2+1 अशी परवानगी असेल. यामध्ये 2 प्रवासी व एक चालक यांचा समावेश असेल.
13. जीप व त्या प्रकारातील वाहतुकीस केवळ 5+1 अशी परवानगी असेल. यामध्ये 5 प्रवासी व एका चालकाचा समावेश असेल.
14. खाजगी कार वाहनास केवळ 3+1 अशी परवानगी असेल. यामध्ये 3 प्रवासी व एक वाहनचालकाचा समावेश असेल.
15. दोनचाकी वाहनावर केवळ एका व्यक्तीस प्रवास करण्यास परवानगी असेल.
16. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये पूर्ण वेळ चालू राहण्यास परवानगी असेल.
17. जिल्ह्यातील सर्व खाजगी कार्यालये सकाळी 10.00 ते सायंकाळी 7.00 या कालावधीत उघडण्यास परवानगी असेल.
18. लग्न व लग्न संबंधित कार्यक्रमांना केवळ 50 व्यक्तींना परवानगी असेल. (वधू व वर पक्षातील सदस्यांच्या समावेशासह 50 व्यक्तींच्या मर्यादेत) . सदर लग्न समारंभ मोकळ्या जागेत करण्यात यावेत. परंतु लग्न समारंभाकरिता संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयाची परवानगी घेणे अनिवार्य असेल.
19. अंत्ययात्रेस केवळ 20 व्यक्तींना परवानगी असेल. यासाठी वेगळ्याने परवानगी घेण्याची गरज राहणार नाही.
प्रतिबंधित :
1. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, लॉन्स, मंगल कार्यालये, जलतरण तलाव इत्यादींना उघडण्यास परवानगी नसेल.
2. जिल्ह्यातील रेस्टॉरंट, हॉटेल्स, बियर आणि वाईन बार इत्यादींना उघडण्यास परवानगी नसेल. परंतु रेस्टॉरंट आणि हॉटेल्स यांना केवळ पार्सल सुविधेसाठी सकाळी 10.00 ते सायंकाळी 7.00 या कालावधी करता उघडण्यास परवानगी असेल.
3. जिल्ह्यातील सर्व धार्मिक, प्रार्थना स्थळे नागरिकांसाठी बंद राहतील.
4. जिल्ह्यातील सर्व धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना व मिरवणुकांना बंदी असेल.
5. जिल्ह्यात धरणे, आंदोलने, पद्रर्शने करण्यासाठी बंदी असेल.
6. वरीलप्रमाणे प्रतिबंधित करण्यात आलेली ठिकाणे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. हिंगोली, पोलीस अधीक्षक, हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, हिंगोली, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. हिंगोली तसेच सर्व संबंधित अधिकारी यांची असेल. या आदेशाची आवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितावर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे आदेशात नमूद केले आहे.
*******
जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 71 रुग्ण ; तर 52 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज
· 410 रुग्णांवर उपचार सुरु तर एकाचा मृत्यू
हिंगोली, (जिमाका) दि. 11 : जिल्ह्यात 71 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 04 व्यक्ती, कळमनुरी परिसर 01 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 61 व्यक्ती, औंढा परिसर 03 व्यक्ती, सेनगाव परिसर 02 व्यक्ती असे एकूण 71 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 52 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 25 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 02 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 27 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 4 हजार 596 रुग्ण झाले असून, त्यापैकी 4 हजार 121 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 410 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 65 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.
****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.