वीजबिलांची होळी
१५ दिवसांत वीजबिलांची दुरुस्ती करा
अन्यथा आंदोलन ः आ. संभाजी पाटील निलंगेकर
लातूर/प्रतिनिधी ः कोरोनाच्या संसर्गाने समाजातील सर्व घटकांना मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितीतच महावितरणने कोरोना काळात अव्वाच्या सव्वा वाढीव वीजबिले शेतकरी व ग्राहकांच्या माथी मारली आहेत. ही वीजबिले दुरुस्त करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष करत महावसुलीत गुंग असलेल्या आघाडी सरकारने शेतकर्यांसह जनतेची घोर फसवणूक केली आहे. त्याचा निषेध म्हणूनच माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी वाढीव वीज बिलांची होळी करण्याचे आवाहन केले होते. या आवाहानाला प्रतिसाद देत होळी पोर्णिमेदिवशी जिल्हाभरात वीज बिलांची होळीकरून महावसुली सरकारच्या नावाने बोंबा मारण्यात आल्या. निलंग्यात आ. निलंगेकरांनी वीज बिलांची होळी करून १५ दिवसांत वीजबिले कमी करून दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊन काळात अनेक महिने दुकाने व विविध उद्योग व्यवसाय ठप्प होती. त्यामुळे अनेकांना मोठ्या आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागले आहे. या लॉकडाऊन काळातच वीज मंडळाने चुकीची आणि भरमसाठ बिले शेतकर्यांसह ग्राहकांच्या माथी मारली आहेत. आधीच अडचणीत सापडलेल्या सर्व समाजघटकांचे या वाढील वीजबिलामुळे आर्थिक कंबरडेच मोडले आहे. लाखो रुपयांची बिले देऊन त्याची सक्तीने महावसुली सरकारकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे याबाबत जिल्ह्यासह राज्यभरातील अनेक वीज ग्राहकांनी असंतोष व्यक्त करून ही बिले दुरुस्त करून देण्याची मागणी केली होती. ही मागणी लावून धरत अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपाने प्रश्न उपस्थित करून आवाज उठविला होता. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज बिलांची दुरुस्ती केल्यानंतरच वसुली करण्यात येईल, तोपर्यंत तोडणीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी युटर्न घेत पुन्हा एकदा आघाडी सरकारकडून वीजबिलांची महावसुली करण्यात येत आहे. विशेषतः शेतकर्यांना तर या वीजतोडणीमुळे मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सुदैवाने यावर्षी पाणी उपलब्ध असले तरी महावसुली सरकारच्या कारभारामुळे हे पाणी पिकांना देणे शेतकर्यांना शक्य होत नाही. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी सर्व समाजघटकांच्या मनाला वेदना देणार्या या वाढीव वीजबिलांची होळी करण्याचे आवाहन करून महाविकास आघाडी सरकारच्या विरुध्द बोंबा माराव्यात असे सांगितले होते. सध्या कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले असल्यामुळे हे आंदोलन प्रत्येकाने आपापल्या घरातच करून त्याचे छायाचित्र व चित्रिकरण सोशल मिडियावर टाकावीत असेही आ. निलंगेकर यांनी यावेळी स्पष्ट केले होते.
काल होळी पौर्णिमेनिमित्ताने माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या आवाहानानुसार संपूर्ण जिल्ह्यात भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकत्यार्र्ंनी आपापल्या परिसरात वीजबिलांची होळी करून महाविकास आघाडी सरकारविरुध्द बोंब मारली. आ. निलंगेकरांनी निलंग्यात या वीज बिलांची होळी करत सरकारने आगामी १५ दिवसांत वीज बिलांची दुरुस्ती करून मगच वसुंली करावी असा इशारा देऊन ही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असेही सांगितले आहे. सध्या कोरोनामुळे आम्ही हे आंदोलन आपापल्या परिसरातच करीत असलो तरी आघाडी सरकारने याकडे दुर्लक्ष करू नये असे स्पष्ट करून आम्हाला जनतेची काळजी असल्यामुळेच आम्ही ही आंदोलने सीमीत स्वरूपात करत असून आगामी काळात या सरकारला जाग न आल्यास नाईलाजास्तव रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा आ. निलंगेकरांनी दिला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष वीजभद्र स्वामी, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, शेषेराव ममाळे, वैभव पाटील, उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, किशोर लंगोटे, अंकुश ढेरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.