राज्यातील ५०० आदर्श शाळांमध्ये मनपा शाळेचा समावेश लातुर महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा

 

राज्यातील ५०० आदर्श शाळांमध्ये मनपा शाळेचा समावेश

लातुर महापालिकेच्या शिरपेचात
मानाचा तुरा




लातूर/प्रतिनिधी: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांपैकी ५०० आदर्श शाळा विकसित करण्यात येणार आहेत. यामध्ये लातूर शहर महानगपालिकेच्या शाळा क्रं ९, मंठाळे नगर या शाळेची निवड राज्य शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे लातूर शहरातील या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि त्यासाठी आवश्यक सोयीसुविधा मिळू शकणार आहेत. शासनाकडून या शाळेची निवड झाल्याने महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
 यापूर्वी शाळेस आयएसओ मानांकन प्राप्त असून दरवर्षी १०० टक्के निकालासह अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवत असतात.
शासनाच्या या निर्णयामुळे शाळेचा दर्जा अधिक उंचावण्यास मदत होणार असून याचा लाभ शहरातील तुलनेने आर्थिकदृष्ट्या दुर्लभ कुटुंबातील विद्यार्थ्यांना होणार असून त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यास मदत मिळणार आहे.
   गतवर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही संकल्पना मांडली होती. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची निवड करण्यात आली आहे. शासकीय निधी, लोकसहभाग आणि विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून या शाळांचा विकास केला जाणार आहे. सर्व शासकीय, जिल्हास्तरीय व ग्रामस्तरीय योजनांचे एकत्रीकरण करून शाळांच्या विकासासाठी विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत.
   शासनाने निवड केलेल्या या ५०० शाळांमध्ये पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सद्य स्थितीत लातूर मनपाच्या शाळेत ४०० हून अधिक पत संख्या आहे. यापुढे जावून किमान १०० ते १५० पटसंख्या असणे अपेक्षित आहे. शाळेच्या परिसरात अंगणवाडी अर्थात पूर्व प्राथमिक वर्ग,आकर्षक इमारत,  असावी,
विद्यार्थी संख्येनुसार वर्गखोल्या उपलब्ध आहेत. मुला- मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, हॅण्डवॉश स्टेशन, मध्यान्ह भोजनासाठी स्वयंपाकगृह आणि भोजनकक्षही उपलब्ध असून आत या शाळेचा आदर्श शाळा उपक्रमात सहभाग झाल्याने अधिक प्रमाणात शैक्षणिक साहित्य व  खेळाचे साहित्य, विद्यार्थ्याना वाचनासाठी वाचनालय व ग्रंथालय सह प्रत्येक वर्ग संगणक कक्ष व व्हर्च्युअल क्लासरुमची सुविधा नव्याने मिळू शकणार आहेत. आपत्ती व्यवस्थापनाच्या  दृष्टिकोनातून आग विझवण्याची सुविधा आणि इमर्जन्सी एक्झिटची सोय, विद्यार्थ्याना नेण्या- आणण्यासाठी वाहनांची सोय अशा उपरोक्त सर्व सोयी-सुविधा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे.
महापालिकेच्या शाळेलाही या सुविधा प्राप्त होणार असून गोरगरीब विद्यार्थ्यांचा यामुळे फायदा होणार आहे. शिक्षणाचा पॅटर्न निर्माण करणाऱ्या लातुरने या माध्यमातून आणखी एक पॅटर्न तयार केला आहे. राज्यातील ५०० शाळांमधून मनपाच्या शाळेची निवड केल्याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त अमन मित्तल, मनपा शिक्षणाधिकारी जाधव, मुख्याध्यापक धोंडीराम भिंगोले नगरसेविका पूजा पंचाक्षरी, फरजाना बागवान, गौरव काथवटे यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त केले.

  महापौरांच्या प्रभागातील शाळा ...
  शहराचे प्रथम नागरिक विक्रांत गोजमगुंडे ज्या भागाचे प्रतिनिधित्व करतात त्या मंठाळे नगर येथेच महानगरपालिकेची ही शाळा आहे. महापौर पदावर असताना आणि त्यापूर्वीही  गोजमगुंडे यांनी या शाळेच्या विकासाकडे जातीने लक्ष दिलेले आहे. त्यांनी काही वर्षांपूर्वी ही शाळा दत्तक घेतलेली असून पालकमंत्री अमित देशमुख यांच्या माध्यमातून शाळेच्या विकासासाठी निधीही उपलब्ध करून घेतलेला आहे. याच शाळेची आता राज्यपातळीवर निवड झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या