सिद्धेश्वर देवस्थानची महाशिवरात्री यात्रा पूर्णतः रद्द कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देवस्थान व प्रशासनाचा निर्णय

 

सिद्धेश्वर देवस्थानची  महाशिवरात्री यात्रा पूर्णतः रद्द

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देवस्थान व प्रशासनाचा निर्णय





 लातूर/
प्रतिनिधी:
युसूफ सय्यद 
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीची ग्रामदैवत सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानची महाशिवरात्री यात्रा पूर्णतः रद्द करण्यात आली आहे.सोमवारी ( दि.१ मार्च )देवस्थानच्या प्रशासक तथा धर्मादाय उपायुक्त श्रीमती यु.एस.पाटील यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
   उपजिल्हाधिकारी सुनील यादव,तहसीलदार स्वप्निल पवार,विश्वस्त अशोक भोसले यांच्यासह भक्तगणांची यावेळी उपस्थिती होती.
  या बैठकीत यात्रा पूर्णतः रद्द करण्याचा निर्णय एक मताने घेण्यात आला. महाशिवरात्रीनिमित्त ठराविक मंडळींच्या उपस्थितीत विधिवत पूजाअर्चा मात्र होणार आहेत.शिवरात्रीच्या दिवशी रात्री गवळी समाजाच्या वतीने केला जाणारा दुग्धाभिषेक केवळ ५ व्यक्तींच्या उपस्थितीत होईल.यासाठी त्यांना पास दिले जातील.सकाळी ९:३० वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात येईल.त्यानंतर पाच लोकांच्या उपस्थितीतच माळी समाजाचा पुष्पाभिषेक संपन्न होईल.
  दरवर्षी गौरीशंकर मंदिरापासून काढण्यात येणारी मानाच्या काठ्यांची मिरवणूक यावर्षी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी या काठ्यांचे गाभाऱ्यातच पूजन होईल. प्रत्येकी दोन मानकऱ्यांच्या हस्ते हे पूजन संपन्न होईल. यात्रा कालावधीत केले जाणारे भजन-कीर्तन व काकडा कोरोना विषयक नियम पाळून केवळ ११ लोकांच्या उपस्थितीत केला जाईल.शिवरात्री निमित्त दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
   कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे निर्णय घेण्यात आले असून भक्त मंडळींनी सहकार्य करावे,असे आवाहन प्रशासक श्रीमती यु.एस. पाटील यांनी केले आहे.या बैठकीस तलाठी दत्ता शिंदे, विशाल झांबरे,व्यवस्थापक दत्ता सुरवसे यांच्यासह सर्व समाजाच्या प्रमुखांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या