ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ मनपाच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांनी घेतली लस

 

ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ 

मनपाच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांनी घेतली लस

लसीकरणास मनपा आरोग्य विभाग सज्ज

शहरातील नागरिकांनी लस घेण्यासाठी नोंदणी करावी 
- महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचे आवाहन 

लातूर/
प्रतिनिधी:
युसूफ सय्यद







शासनाच्या निर्देशानुसार लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने वय वर्ष ४५ते ५९ व ६० वर्षा पुढील नागरिकांना कोरोना लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्या उपस्थितीत दि.१मार्च रोजी या मोहिमेचा शुभारंभ मनपाच्या विलासराव देशमुख शासकीय विज्ञान केंद्र येथील केंद्रावर करण्यात आला. पहिल्या दिवशी शहरातील शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली. यावेळी मनपा आरोग्य अधिकारी डॉ महेश पाटील व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण नोंदणी सुरू झाली असून ही नोंदणी करत या वयोगटात असणाऱ्या नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.
  लसीकरणाच्या पुढील टप्प्याबाबत माहिती देताना महापौर गोजमगुंडे म्हणाले की,४५ ते ५९ वर्ष मधील सहव्याधी असणाऱ्या व ६० वर्ष पुढील सर्व नागरिक या दोन्ही वयोगटात समाविष्ट असणाऱ्या नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये  आरोग्यसेतू ॲप अथवा CO-win ॲप डाऊनलोड करावे. cowin.gov.in या वेबसाईटवरही नोंदणी करता येऊ शकते. तेथे मिळणाऱ्या सूचनांनुसार नागरिकांनी आपली नोंदणी करून घ्यावी.
   महापौर म्हणाले की, दि.१ जानेवारी २०२२ नुसार आपले वय ४५ ते ५९ वर्ष दरम्यान असल्यास आणि हृदयविकार,मधुमेह,कर्करोग, अवयव प्रत्यारोपण,श्वसन विकार, उच्च रक्तदाब आदी प्रकारच्या व्याधी असतील तर त्याबाबत डॉक्टरांचे प्रमाणपत्र सोबत जोडावे. वय ६० वर्षांपेक्षा अधिक असल्यास डॉक्टरांच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
 संबंधित ॲपमध्ये नागरिकांनी नजीकचे लसीकरण केंद्र आणि तारखेची निवड करता येणार आहे. हे शक्य नसेल तर लसीकरण केंद्रावर जाऊनही नोंदणी करता येऊ शकते. मनपाच्या लसीकरण केंद्र येथे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच खाजगी रुग्णालयात  लसीकरणासाठी २५० रुपये शुल्क द्यावे लागणार असल्याचेही ते म्हणाले. शहरातील महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना अतंर्गत असणाऱ्या खाजगी रुग्णालय येथे सशुल्क लस घेता येणार आहे.
महानगरपालिकेचा आरोग्य विभाग या लसीकरण मोहिमेस सज्ज असून या दोन्ही वयोगटात समाविष्ट असणाऱ्या नागरिकांनी लसीकरणासाठी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी. लसीकरण करून घ्यावे आणि आपले आरोग्य सुदृढ ठेवावे, असे आवाहनही महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या