लातूर/प्रतिनिधी:लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. यामुळे अशा व्यक्तींची लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
शनिवारपासून (दि.१७ एप्रिल) त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर करून संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवांना संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे.अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक मोठ्या संख्येने शहरात फिरत आहेत.वारंवार समज देऊनही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही.त्यामुळे अशा व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही सोबतच कोरोना चाचणी करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.
शनिवारी अशा काही व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली.मुख्य रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तींना गांधी चौकातील जलकुंभ परिसरात असणाऱ्या पालिकेच्या झोनल कार्यालयात नेऊन त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. यावेळी सहाय्यक आयुक्त मंजुषा गुरमे ,पोलीस निरीक्षक संजय हिबारे, क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे ,आरोग्य कर्मचारी उपस्थित होते . गांधी चौकाप्रमानेच इतर मुख्य चौक येथेही अशा चाचण्या केल्या जाणार आहेत.कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये.अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली रस्त्यावर गर्दी करू नये.स्वतः सोबतच कुटुंबियांची काळजी घेण्यासाठी शासनाच्या निर्देशांचे पालन करावे,असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार व आयुक्त अमन मित्तल यांच्या वतीने करण्यात आले आहे. असे असतानाही विनाकारण फिरणारे नागरिक आढळले तर अशा प्रत्येकाची यापुढे कोरोना चाचणी केली जाईल, असा इशारा महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.