पत्रकारांचा कोविड विमा उतरवा प्रेस क्लब गोवाचे माध्यमांना आवाहन



पत्रकारांचा कोविड विमा उतरवा

प्रेस क्लब गोवाचे माध्यमांना आवाहन






पणजीः प्रतिनिधी 

कोविड मुळं पत्रकारांचे जाणारे बळी आणि त्यांच्या कुटुंबाची होणारी वाताहत देशभर वाढत चालली आहे. गोव्यात देखील अनेक पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत आणि काहींना अर्ध्या पगारावर काम करावे लागत आहे. हे सर्व लक्षात  घेऊन सर्व वाहिन्या आणि दैनिकांच्या व्यवस्थापनांनी पूर्णवेळ पत्रकार, ग्रामीण वार्ताहर तसेच पार्ट टाइम वार्ताहरांचा तातडीने कोविड विमा उतरावा असे आवाहन प्रेसा क्लब गोवाने केले आहे.

प्रेस क्लब गोवाचे अध्यक्ष दिलीप बोरकर व सरचिटणीस अनंत जोशी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात हे आवाहन केले आहे.

शेजारच्या महाराष्ट्रात एप्रिल  महिन्यात अवघ्या २२ दिवसात कोरोनानं तब्बल ३३ पत्रकारांचे बळी घेतले आहेत. ऑगस्ट २०२० ते २७ एप्रिल २०२१ या कालावधीत १०५ पत्रकारांचे महाराष्ट्रात बळी गेले आहेत. शेकडो पत्रकार बाधित झाले आहेत. अनेक पत्रकारांकडे उपचारासाठी पैसे नाहीत आणि ज्या पत्रकारांचे निधन झाले आहे. त्यांची कुटुंबं रस्त्यावर आली आहेत. कारण दुसरया लाटेत जे पत्रकार बळी गेले आहेत, त्यातील बहुसंख्य पत्रकार ३५ ते ५० या वयोगटातील होते. कुटुंबाची जबाबदारी अंगावर असतानाच घरचा कर्ता पुरूषच गेल्याने कुटुंबंच उद्ध्वस्त झाली आहेत. दुर्दैवानं तेथील एकाही माध्यम समूहाने मृत पत्रकारांच्या कुटुंबाला कसलीही मदत केली नाही, असा दावा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने केला आहे.

 अशी वेळ गोव्यातील पत्रकारांवर येऊ नये यासाठी राज्यातील सर्व वृत्त वाहिन्या आणि वृत्तपत्रांनी किमान आपल्या पत्रकारांचा कोविड विमा उतरावा, असे आवाहन प्रेस क्लब गोवाने केले आहे. गोव्यातील अनेक पत्रकार व संपादक कोविड बाधित झाले आहेत. सुदैवाने ते बरे झाले असले तरी या सर्वांना खास करोना विमा कवच देण्याची गरज आहे, असे प्रेस क्लब गोवाने म्हटले आहे.

प्रेस क्लब गोवाचे सदस्य झालेल्या शहरी, ग्रामीण, पूर्णवेळ, अर्धवेळ अशा सर्वांचा सामूहिक विमा उतरविण्याचा निर्धार प्रेस क्लब गोवानेही केला आहे. त्यास माध्यम व्यवस्थापनांच्या विमा कवचाची जोड मिळाल्यास ही सर्व पत्रकारांसाठी दिलासा देणारी बाब ठरेल, असे या पत्रकात प्रेस क्लब गोवाने स्पष्ट केले आहे.

-------------

पणजी दि. २४/एप्रिल २०२१

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या