लातूर रेल्वेस्थानकावर कोविड सेंटर उभारावे
-निजाम शेख यांचे रेल्वेमंत्र्यांना निवेदन
लातूर/प्रतिनिधी: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत.अशा स्थितीत रेल्वेने अत्यवस्थ रुग्णांसाठी रूग्णालयात रुपांतरीत केलेले कोच लातूर येथे पाठवून लातूरच्या रेल्वे स्थानकावर कोविड सेंटरची उभारणी करावी,अशी मागणी महाराष्ट्र मध्यप्रदेश कर्नाटक झोनल रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख यांनी केली आहे.यासंदर्भात शेख यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांच्या मार्फत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना निवेदन दिले आहे.
या केंद्रासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीतून १०० व्हेंटिलेटर देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
लातूर जिल्ह्यासह परिसरात दिवसेंदिवस कोरोनाचा आलेख वाढत आहे.शासकीय व खाजगी रुग्णालयातील बेड अपुरे पडत आहेत.कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता रेल्वेने अनेक कोचचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर केलेले आहे.असे ४८२ कोच मुंबई येथे तयार आहेत.एका कोचमध्ये १६रुग्णांवर उपचार होवू शकतात.यापैकी किमान ३६ कोच लातूर येथे पाठवले तर एकूण ५७६ रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे.
रेल्वेने तयार केलेल्या कोचमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत.अत्यवस्थ रुग्णांसाठी ते फायद्याचे ठरणार आहेत.रेल्वे मंत्रालयाने हे कोच पाठवून द्यावेत.शिवाय अत्यवस्थ रुग्णांसाठी पंतप्रधान सहाय्यता निधीतून १०० व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून द्यावेत.लातूरच्या रेल्वे स्थानकावर अद्ययावत सुविधा आहेत.सरकारने कोच,व्हेंटिलेटर्स व ऑक्सिजन उपलब्ध करून दिले तर हजारो रुग्णांना त्याचा लाभ होऊ शकणार आहे.रेल्वे मंत्रालयाने या मागणीची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात,अशी मागणीही निजाम शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत रेल्वेमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अमित देशमुख यांनाही या निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.
पालकमंत्री अमित देशमुख यांनी निवेदनाची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांनीही योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती निजाम शेख यांनी दिली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.