स्थायी समितीच्या दोन काँग्रेस सदस्यांचे निलंबन सभापती अ‍ॅड. दिपक मठपती यांचा निर्णय

 

स्थायी समितीच्या दोन काँग्रेस सदस्यांचे निलंबन
सभापती अ‍ॅड. दिपक मठपती यांचा निर्णय




लातूर/प्रतिनिधी ः- शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची शुक्रवार दि. 9 एप्रिल रोजी शहर विकासाला हातभार लावण्यासह कांही सामाजिक विषयांकरीता बैठक आयोजित करण्यात आली होती. एकुण दहा विषयांसाठी सभापती अ‍ॅड. दिपक मठपती यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. मात्र या बैठकीत काँग्रेस सदस्य अशोक गोविंदपुरकर व रविशंकर जाधव या दोन सदस्यांना सभागृहाचा अवमान करण्यासह गोंधळ घातल्यामुळे सभापती अ‍ॅड. दिपक मठपती यांनी या दोन सदस्यांना दहा दिवसासाठी निलंबन करण्याचा निर्णय घेतला.
स्थायी समिती सभापती अ‍ॅड. दिपक मठपती यांनी आज शुक्रवार दि. 9 एप्रिल रोजी मनपाच्या सभागृहात स्थायी समिती सदस्यांची बैठक आयोजीत केली होती. या बैठकीच्या विषय पत्रिकेवर एकूण दहा विषय होते आणि या विषयांवर चर्चा होणे अपेक्षीत होते. सदर विषय शहराच्या विकासाला हातभार लावण्यासह कांही सामाजिक विषयही होते. मात्र या सभेच्या सुरुवातीपासूनच काँग्रेस सदस्यांनी कायद्यानुसार सदर बैठक सभापती अ‍ॅड. दिपक मठपती यांना बोलविता येत नाही आणि या बैठकीत कोणतेही धोरणात्मक अथवा आर्थिक निर्णय घेता येत नाहीत असे सांगून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सदस्य अशोक गोविंदपुरकर यांनी कोणत्या कायद्याआधारे सभापतींना निर्णय घेता येतात असे सांगून प्रचंड गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांनी सभापतीसह प्रशासनातील कांही अधिकार्‍यांनाही अरेरावीची भाषा केली. सोबतच सभेसाठी आवश्यक असणारे प्रोसेडिंग बुकही ताब्यात घेतले. सदस्य गोविंदपूरकर यांच्यासोबत सदस्य रविशंकर जाधव यांनीही गोंधळ घातला. या दोघांनी घातलेल्या गोंधळामुळे सभागृहाचा अवमान होत असल्याचे सातत्याने सभापती अ‍ॅड. दिपक मठपती यांनी निदर्शनास आणून दिले. तरीही या दोन्ही सदस्यांनी आपला गोंधळ सुरुच ठेवला. सभापती अ‍ॅड. मठपती यांनी या दोन सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल वारंवार सांगितले. या नंतरही सदस्यांचा गोंधळ सुरुच राहिल्याने सभापती अ‍ॅड. मठपती यांनी अखेर सदस्य अशोक गोविंदपूरकर व रविशंकर जाधव यांना दहा दिवसाकरीता निलंबन करण्याचा निर्णय घेतला. या गोंधळातच सर्व विषयांना मंजूरी देण्यात आलेली असून राष्ट्रगीताने बैठकीची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या