दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत ४६९ लाभार्थ्यांना ७० लाखाचा आर्थिक लाभ
कुष्ठरोगी व्यक्तींना ४ लाख ९२ हजार निर्वाह भत्त्याचे वाटप
महानगरपालिकेचा पुढाकार
लातूर/प्रतिनिधी: शासनाने दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी लागू केलेल्या समान संधी,संरक्षण व समान सहभाग कायद्याअंतर्गत महानगरपालिकेने ४६९ लाभार्थ्यांना ७०लाख ३५ हजार रुपयांचे आर्थिक लाभ प्रदान केले आहेत. याशिवाय नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात कुष्ठरोगी व्यक्तींना ४ लाख ९२ हजार रुपयांचा निर्वाहभत्ताही प्रदान करण्यात आला आहे.
शासनाने केलेल्या कायद्यान्वये स्थानिक स्वराज्य संस्थांचा ५ टक्के निधी दिव्यांग व्यक्तींचे कल्याण व पुनर्वसनासाठी राखीव ठेवण्यात येतो. त्याअंतर्गत लातूर महानगर पालिकेने हे लाभ दिलेले आहेत.दिव्यांग व्यक्ती हे समाजाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्यातील शारीरिक व्यंगावर मात करण्यासाठी त्यांना सहाय्य करून कार्यक्षम, स्वावलंबी व समाजातील समावेशित घटक बनण्यास आवश्यक ती शक्ती प्रदान करून त्यांना सक्षम करणे ही नैतिक जबाबदारी मानून हे अर्थसाह्य लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले.
दिव्यांगांना चलनवलन साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य या योजनेंतर्गत महापौर विक्रांत गोजमगुंडे,उपमहापौर चंद्रकांत बिराजदार,आयुक्त अमन मित्तल यांच्या निर्देशानुसार आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये एकूण ४६९ लाभार्थ्यांना ७० लाख ३५ हजार रुपये महापालिकेच्या माध्यमातून देण्यात आले.
कुष्ठरोगी व्यक्तींना निर्वाह भत्ता देण्याचे कामही मनपाने केले. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात ४ लाख ९२ हजार रुपये निर्वाह भत्ता संबंधित व्यक्तींना प्रदान करण्यात आला.
दिव्यांग व कुष्ठरोगी व्यक्तींना शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यास महानगरपालिका तत्पर आहे. त्या अनुषंगाने वेळोवेळी तत्परतेने योजना लागू करून लाभ देण्यात आलेले असल्याचे लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.