ऑन कॉल रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट मशीन उपलब्ध करून द्यावी* *-पालकमंत्री अमित देशमुख*


 

*ऑन कॉल रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट

मशीन उपलब्ध करून द्यावी*

                                           *-पालकमंत्री अमित देशमुख*

 

*कोरोना च्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने आवश्यक असलेले साहित्य व उपकरणे खरेदीची माहिती तात्काळ द्यावी*

 

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णांना गरज असल्यास तात्काळ व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करावी*

 

*जिल्हा शल्यचिकित्सक यांनी जिल्हा रुग्णालयासाठी वाढीव 100 खाटांचा प्रस्ताव सादर करावा*

 

*लातूर महापालिकेने दिल्लीच्या धर्तीवर शहरात मोहल्ला क्लिनिक सुरू करावेत*

 






 

लातूर, दि.28(जिमाका):- कोरोना च्या पार्श्वभूमीवर गृह विलगीकरणातील कोरोना बाधित रुग्णांनी शासकीय आरोग्य यंत्रणेकडे ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेट ची मागणी केल्यास संबंधित रुग्णांना नाम मात्र शुल्क  आकारून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

      शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित कोरूना च्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेला आवश्यक असलेले साहित्य व उपकरणाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापौर विक्रांत गोजमगुंडे, महापालिका आयुक्त अमन मित्तल, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार पालिका विरोधी पक्ष नेते संभाजी सूळ, महापालिका उपायुक्त श्रीमती शिंदेकर,  विलासराव  देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्‍मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

       पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, कोरोना ची सद्यस्थिती व संभाव्य तिसरी लाटेच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम असली पाहिजे. याकरिता आरोग्य यंत्रणेने त्यांना आवश्यक असलेले आरोग्यविषयक साहित्य व उपकरणे यांची माहिती तात्काळ सादर करावी. त्या अनुषंगाने सदरील साहित्य, उपकरणे व औषधी नियमानुसार राज्यस्तर व जिल्हास्तरावर खरेदी करून ठेवणे शक्य होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांना अधिक दर्जेदार आरोग्य सुविधा देता येतील, असे त्यांनी सांगितले.

       विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील डॉक्टरने कोरोना बाधित रुग्णांना गरज असेल तर तात्काळ व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. कोणत्याही रुग्णांची रुग्णालय प्रशासनाने व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिला नाही अशी तक्रार पुढील काळात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले. लातूर शहर महानगरपालिकेने दिल्लीच्या धर्तीवर लातूर शहरात मोहल्ला क्लीनिक निर्माण करावेत व शहरातील गरजू रुग्णांना त्यांच्या गल्लीमध्ये त्यांना उपचार मिळतील याची व्यवस्था करावी. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी जिल्हा रुग्णालयासाठी 100 खाटांची वाढिव मागणीचा प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी सूचित केले.

        उदगीर उपजिल्हा रुग्णालय मध्ये आधिकचे पाच तर निलंगा उपजिल्हा रुग्णालयात अधिकचे दोन वेंटिलेटर आरोग्य विभागाने उपलब्ध करून द्यावेत. तर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था एकूण तीस व्हेंटिलेटर उपलब्ध कराव्यात तर प्रत्येक ग्रामीण रुग्णालय साठी एक वेंटिलेटर उपलब्ध करून द्यावा यासाठी व्हेंटिलेटर खरेदीची मागणी प्रस्ताव संबंधिताने तात्काळ सादर करावेत अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी देऊन जिल्हा आरोग्य अधिकारी यांना 100, जिल्हा शल्य चिकित्सक यांना 100 व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था यांना 40 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदी करण्यासाठी कार्यवाही करावी असेही त्यांनी सांगितले. 

     कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य यंत्रणेकडे पुढील सहा महिने पुरेसा होईल इतका औषधी साठा असला पाहिजे. जेणेकरून रुग्णांची संख्या वाढल्यास त्यांना तात्काळ औषधी पुरवठा करणे शक्य होईल असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.

    यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा स्तरावर व्हेंटिलेटर खरेदी करता येणार नाहीत, तर लातूर जिल्ह्याला आवश्यक असलेले 40 व्हेंटिलेटर राज्यस्तरावर खरेदी करून मिळावेत अशी मागणी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपा आयुक्त मित्तल, जिल्हा शल्य चिकित्सक देशमुख, अधिष्ठता डॉक्टर देशमुख, डॉक्टर परगे यांनी ही आरोग्य विभागाला आवश्यक असलेल्या साहित्य, उपकरणे व औषधींची माहिती दिली.

             

 

                                                   **********

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या